दिव्यांग भाग्यरथाबाईच्या आयुष्यात अंधारच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:08 AM2017-12-03T00:08:02+5:302017-12-03T00:10:08+5:30
जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात.
प्रकाश काळे ।
आॅनलाईन लोकमत
गोवरी : जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, करणार काय? जन्मताच पदरी आयुष्यात दिव्यांगाचे जगणे आले. मात्र जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ती मिळेल ते काम करून संसाराचा गाडा पुढे रेटत आहे.
राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथील भाग्यरथाबाई विठोबा निब्रड (४८) या दिव्यांग महिलेची ही मन हेलावणारी कहाणी आहे. जन्मताच भाग्यरथाबाईला अपंगत्व आले. कमरेपासून दोन्ही पाय जन्मताच लुळे पडल्याने तिला सामान्याप्रमाणे चालता येत नाही. हाताचा आधार घेवून तिला कसेबसे चालावे लागते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. परंतु, भाग्यरथाबाईला पायांनी चालता येत नसल्याने हातावर चालण्याशिवाय पर्याय नाही.
घरची परिस्थिती बेताची आहे. झोपडीवजा घरात तिचा संसार सुरू आहे. तिला दोन मुले आहेत. परंतु त्यांनीही आपला वेगळा संसार थाटला. कुणाकडे मजुरीला जावे तर तिला शेतावर जावून कामही करता येत नाही. भाग्यरथाबाई दिव्यांग असल्याने तिला मजुरीसाठी कामावर बोलावणार तरी कोण? तिला सामान्याप्रमाणे काम करता येत नाही. त्यामुळे ती हतबल झाली. तिच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. परंतु, तिने धीर सोडला नाही. माणूस कसाही असला तरी त्याला पोटाची भूक भागविण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधून काढावाच लागतो.
उपाशी पोट माणसाला जीवंतपणीच जाळत असते. म्हणून भाग्यरथाबाई गावात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. शासनाकडून ६०० रुपये एवढी तोकडी मदत भाग्यरथाबाईला मिळते, एवढीच शासनाची मेहरबानी. दरवर्षी शासन दिव्यागांसाठी विविध योजना राबविते. परंतु, त्या योजना ेगरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, मात्र हे दुर्दैवच आहे. त्यामुळे भाग्यरथाबाईला शासनाकडून मिळत असलेल्या ६०० रुपयात संसाराचा गाडा चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
जन्मताच कायमचे अपंगत्व आले आणि भाग्यरथाबाईच्या आयुष्यात कायमचा अंधारच पसरला. समाजात अशा असंख्य भाग्यरथाबाई आहेत, ज्यांच्यापर्यंत शासनाच्या दिव्यांगासाठीच्या योजना अजूनही पोहचल्या नाही. दरवर्षी शासन विकलांगासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. परंतु, त्याचा फारसा लाभ अपंग दिव्यागांना होत नाही, हे दुर्दैव आहे.
जागतिक अपंग दिनी शासन दिव्यागांचा गौरव करेलही. परंतु, विकलांगतेमुळे ज्यांचे आयुष्यच करपले त्यांचे काय? शासन दिव्यांगाच्या आयुष्यात प्रकाश पेरणार की त्यांना असेच वाºयावर सोडून देणार, हा प्रश्न आजही कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच असून दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम..!