ज्ञानसंपदेच्या बळावर करा जगाचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:28 PM2018-12-15T22:28:56+5:302018-12-15T22:29:22+5:30
जगाचे नेतृत्व कधीकाळी पेट्रोल, डिझेल व अन्य भौतिक संपन्नतेवर केले जात होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. या जगाचे नेतृत्व ज्यांच्याकडे ज्ञानसंपदा आहे, तेच करू शकतात. त्यामुळे यशाचे मार्गक्रमण करताना मेहनतीच्या बळावर ज्ञान संपन्नता मिळवून जगाचे नेतृत्व भारताला मिळवून द्या, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगाचे नेतृत्व कधीकाळी पेट्रोल, डिझेल व अन्य भौतिक संपन्नतेवर केले जात होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. या जगाचे नेतृत्व ज्यांच्याकडे ज्ञानसंपदा आहे, तेच करू शकतात. त्यामुळे यशाचे मार्गक्रमण करताना मेहनतीच्या बळावर ज्ञान संपन्नता मिळवून जगाचे नेतृत्व भारताला मिळवून द्या, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये इन्स्पायर इन्स्टिट्युटच्या वार्षिक समारंभात गुणवंतांना पुरस्कार देताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. आशिष बदखल, इन्स्पायरचे संचालक प्रा. विजय बदखल उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा. प्रयत्नांतून यश मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक तालुक्यात सुरू होणार सुसज्ज ग्रंथालय
जिल्ह्यातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करता यावे. राज्य शासनाच्या मेगा भरतीमध्ये जिल्ह्याचा टक्का वाढावा, यासाठी मिशन सेवा सुरू करण्यात आले. शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियान, डिजिटल शाळा सुरू झाल्या. अनेक ठिकाणी अभ्यासिकाही सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे. मिशन सेवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलांना मान्यवरांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिल्या जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. आशिष बदखल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. विजय बदखल यांनी केले.