निवडणुकीत पैशाचा वापर होऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:23 PM2019-03-20T22:23:29+5:302019-03-20T22:23:55+5:30
कधीकाळी निवडणुकांवर समाजातील दांडगाई करणाऱ्या अर्थात मसल पॉवरचा प्रभाव असायचा. मात्र आता कायदा सुव्यवस्था कणखरपणे कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पैशाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईकरिता प्रशासनाने सज्ज असावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक एम.के. बिजू यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कधीकाळी निवडणुकांवर समाजातील दांडगाई करणाऱ्या अर्थात मसल पॉवरचा प्रभाव असायचा. मात्र आता कायदा सुव्यवस्था कणखरपणे कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पैशाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईकरिता प्रशासनाने सज्ज असावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक एम.के. बिजू यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हा अधिकारी सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, जिल्हा परिषदचे मुख्य लेखा अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी अशोक माटकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, जिल्हा कोषागार अधिकारी डी. एम. पेंदाम, उत्पादन शुल्क विभागाचे एस. के. धोमकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सतीश खडसे, ओमप्रकाश आर्य, कार्यकारी अभियंता तथा निरीक्षकांचे संपर्क अधिकारी डी.सी. पिपरे आदी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक बिजू म्हणाले, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कोणत्याही माध्यमातून पैशाचा प्रभाव टाकणाºया यंत्रणेला मोकळीक मिळता कामा नये. पैसा पुरवणे, पैशांची देवाण-घेवाण करणे, पैशांचे आमिष दाखविणे, अवैधरित्या पैशाची वाहतूक करणे किंवा अन्य कोणत्यााही कारणावरून पैशांचा वापर निवडणुकांमध्ये होऊन त्यावर प्रभाव पाडला जाईल, अशी कोणतीही कृत्ये होण्यापूर्वीच दक्ष असावे, असे निर्देश त्यांनी बिजू यांनी दिले. पोलीस दलाने मागील काही दिवसांमध्ये कोट्यवधी रूपयांची दारू जप्त केली. ही मोहीम सुरूच ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या यंत्रणेत कमी खर्च व्हावा तसेच मतदारांना अतिशय सुलभतेने आपला मताधिकार बजावता यावा. ग्रामीण भागातील जनतेने १९५० टोलफ्री क्रमांकाचा वापर करून मतदार यादी व मतदानाविषयीच्या अडचणी प्रशासनाकडे मांडव्या. नागरिकांकडून टोलफ्री क्रमांकाचा जिल्ह्यात चांगला वापर होत आहे, असे सांगून निवडणूक खर्च निरीक्षक बिजू यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील प्रशासकीय तयारीची माहिती दिली. विधानसभानिहाय नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी याविषयी बैठकीत माहिती सादर केली.
आयकर विभागाने लक्ष द्यावे
लोकसभा निवडणूकदरम्यान आयकर विभागाने आर्थिक देवाण-घेवाणीवर विशेष लक्ष ठेवावे. हे अव्यवहार संशयास्पद वाटल्यास तातडीने चौकशी सुरू करावी. सांगितले. जिल्ह्यातील सर्व बँकांनी आर्थिक व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर होणार नाही, याकरिता आयकर विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे निरीक्षक एम. के. बिजू म्हणाले.
‘सी-व्हिजिल’ वर तीन तक्रारी
वरोरा येथे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तीन तक्रारी सी- व्हिजिल अपॅवर प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन तातडीने निपटारा करण्यात आला आहे.