पाणीटंचाईच्या उपाययोजनात हयगय नको

By admin | Published: May 8, 2017 12:34 AM2017-05-08T00:34:19+5:302017-05-08T00:34:19+5:30

जिल्हयातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेणे आवश्यक ठरते.

Do not be afraid of water scarcity measures | पाणीटंचाईच्या उपाययोजनात हयगय नको

पाणीटंचाईच्या उपाययोजनात हयगय नको

Next

सुधीर मुनगंटीवार : स्थानिक प्रतिनिधींना सहभाग महत्त्वाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हयातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेणे आवश्यक ठरते. स्थानिक प्रतिनिधींना सामान्य जनतेच्या पाणी पुरवठयासारख्या समस्येची वस्तुनिष्ठता माहिती असते. त्यामुळे आराखडा तयार करताना प्रत्यक्ष पाणी टंचाईच्या काळात निर्णय घेताना लोकप्रतिनिधींच्या मागणीचा व सूचनांचा समावेश करण्यात यावा, पाणी टंचाईच्या उपाययोजनात हयगय करू नका, अशी सूचना वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी घेतलेल्या पाणीटंचाईच्या बैठकीत केली.
यावर्षी सरासरीपेक्षा २२ टक्के पर्जन्यमान अधिक झाले असल्याने जिल्हयात संभाव्य पाणी टंचाईबाबत भीषणता नाही. मात्र जिल्हयातील काही दूर्गम भागात पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे अशा दूर्गम भागातील लोकप्रतिनिधींकडून सूचना आल्यानंतर प्रथम नागरिकांची तक्रार राहणार नाही, यासाठी आवश्यकता असेल तर टँकरने पाणी पुरवठा करा, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्हयाच्या संभाव्य पाणी टंचाईसाठी जिल्हा परिषदेने सहा कोटी २७ लाख रुपयांचा उपाय आराखडा तयार केला आहे. जिल्हयातील ४१३ टंचाईग्रस्त गावांसाठी ५७८ उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जिल्हयामध्ये यावर्षी केवळ १० टँकर सुरु असून टँकरमुक्तीच्या दृष्टीने जिल्हयात पाणी पुरवठयाची व्यवस्था केली जात आहे.
आमदार संजय धोटे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे यांनी केलेल्या काही सूचनांना अतिशय गंभीरतेने घेत पालकमंत्र्यांनी जिल्हयातील दूर्गम व सीमावर्ती भागात जिल्हा परिषद यंत्रणेने दुर्लक्ष करू नये, अशी तंबीही दिली. जिवती, कोरपना आदी तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या घटनांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोकरी गावाच्या पाणी पुरवठयाचा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला होता. या ठिकाणी टँकरने तात्काळ पाणी पुरवठा करावा, असे आदेश त्यांनी दिले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व अन्य पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी आवाहन करताना स्पष्ट केले की, दरवर्षीच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयाची अंमलबजावणी करताना त्यातील प्रत्येक तरतुदीची पूर्तता झाली अथवा नाही याची तपासणी करण्यात यावी. उन्हाळयात उपाययोजनासाठी होणाऱ्या बैठकांमधील प्रस्ताव पाऊस पडल्यानंतरही दुर्लक्षित होता कामा नये, केलेले नियोजन त्याच वर्षी पूर्ण करा, असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. हातपंप दुरुस्ती, नादुरुस्त नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, याबाबतचा दरवर्षीचा आकस्मिक आराखडा तयार ठेवा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे उपस्थित होते.

Web Title: Do not be afraid of water scarcity measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.