दारू विके्रत्यांना मिळणार नाही ग्रामपंचायत योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:52 PM2018-09-01T23:52:08+5:302018-09-01T23:52:42+5:30
गावात दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव येरगाव ग्रामसभेने पारीत केला. दारूबंदीसाठी असा प्रेरणादायी निर्णय घेणारी निर्णय जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
शशीकांत गणवीर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : गावात दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव येरगाव ग्रामसभेने पारीत केला. दारूबंदीसाठी असा प्रेरणादायी निर्णय घेणारी निर्णय जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
दारूबंदी असतानाही गावात दारू विक्री सुरू असल्यामुळे युवापिढी व्यसनांच्या आहारी गेली होती. अनेक कुटुंंबांमध्ये वाद निर्माण झाले. महिला त्रस्त झाल्या. दारूबंदीसाठी यापूर्वी काही नागरिकांनी प्रयत्न केले होते. परंतु आळा बसला नाही. अखेर युवक व महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांपर्यंत हा विषय नेला. सरपंच महादेव नागापुरे, उपसरपंच नलिनी नागापुरे, ग्रामपंचायत सदस्य रूमदेव गोहणे, प्रतिभा नागापुरे, गणेश तोडासे, शारदा रायपुरे, प्रियंका गेडाम, माया कुळमेथे, कापूरदास गेडाम, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद नागपुरे, माजी सरपंच संजय पुलझेले, पोलीस चावरे, ग्रामसेवक एम. पी. दडांजे, पोलीस पाटील चंदू चावरे आदींनी या विषयावर चर्चा करून ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ही ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. दारूबंदी असल्यामुळे गावात कुणी दारूविक्री केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. परंतु गावकºयांनी निर्णय घेतल्यास ग्रामपंचायतकडून सर्वदृष्टीने मदत केली जाईल, अशी भूमिका सरपंच गोहणे यांनी मांडली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात दारूबंदी झाली. याची अमंलबजावणी येरगावात झालीच पाहिजे, यासाठी ग्रामसभेने चर्चा करण्याची विनंती सभेत करण्यात आली. या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. गावात दारूविक्री करणाºया व्यक्तीला ग्रामपंचायतच्या विकास योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. दारू विक्रेत्यांना रहिवासी दाखले, उत्पन्न व अन्य कोणतेही प्रमाणपत्र ग्रामपंचायतने देऊ नये, दारूविक्री करताना पोलिसांनी अटक केल्यास गावातील व्यक्तीने जमानत घेतल्यास त्यांनाही ग्रामपंचायतच्या योजना किंवा दाखले देण्यास मनाई करण्याचा ठराव ग्रामसभेने पारीत केला आहे.
कोंबडा बाजार, जुगाऱ्यांनाही शिक्षा
येरगाव येथे कोंबडा बाजार व जुगार खेळल्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. कारवाई करण्यासाठी ग्रामसभेने पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांची समिती तयार करण्यात आली. गावातील अवैध व्यवसायांना आळा बसावा, यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले होते. मात्र उपयोग झाला नव्हता. ग्रामसभेने ठराव घेऊन ग्रामपंचायतच्या योजनांचा लाभ देण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे येरगावचा हा ठराव मूल तालु्क्यात चर्चेचा विषय ठरला आहे.