दु:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:35 AM2018-02-16T00:35:14+5:302018-02-16T00:35:32+5:30
‘श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही....’ कर्मयोगी बाबा आमटे यांच्या या ओळी. संघर्षमय प्रवासातील यात्रेकरूंना तंतोतंत लागू पडणाऱ्या. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास अंगी असला की परिस्थितीला वाकविण्याची ताकद आपसुकच अंगात येते.
रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही....’ कर्मयोगी बाबा आमटे यांच्या या ओळी. संघर्षमय प्रवासातील यात्रेकरूंना तंतोतंत लागू पडणाऱ्या. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास अंगी असला की परिस्थितीला वाकविण्याची ताकद आपसुकच अंगात येते. अशोक पागडे नावाच्या तरुणाने हे सिद्ध करून दाखविले आहे. विषम परिस्थितीत आपले ध्येय पूर्ण करीत असताना होणाऱ्या अनंत यातनांना तिथेच थोपवित अशोकने स्पर्धा परीक्षेतील आपले इप्सित साध्य करून इतरांसाठी प्रेरणावाट मोकळी करून दिली आहे.
तीन वर्ष कठोर परिश्रम घेतल्यानंतर अशोकने बँकींग क्षेत्रातील ग्रेड-१ श्रेणीतील परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आजचे युग स्पर्धेचे आहे. लाखो तरुण जीव ओतून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. मात्र बहुतांश युवक हे ना ते कारण पुढे करीत मैदान सोडताना दिसतात. ज्यांना अश्रू गाळत बसण्यात वेळ नसतो, ते मात्र ध्येय गाठतात. अशोक पागडे हा मूळ बल्लारपूरचा. २००२ मध्ये त्याचे पित्रुछत्र हरविले. घरात आई, लहान बहिण आता तो. कुटुंबाची जबाबदारी आपसुकच त्यांच्या खांद्यावर. कागदपत्रातील काही चुकांमुळे वडील बल्लारपूर पेपरमीलमध्ये असतानाही पेन्शन मिळाली नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा बिकट प्रश्न. अशोकने मिळेल ते काम करणे सुरू केले. पेंटींग, वेटर, आचाऱ्याचा हेल्पर असे काम करीत तो गाडा पुढे रेटत राहिला. काम करताना शिक्षण घेणे जड वाटू लागले. शिक्षण मध्येच सोडून द्यायचं, असे ठरविले. परिस्थितीमुळे घरच्यांनीही आढेवेढे घेतले नाही. मात्र मित्रांनी कडाडून विरोध केला. मित्रांच्या आग्रहामुळे अशोकने कॉमर्स शाखेतील पदवी पूर्ण केली. २००९ मध्ये बल्लारपूर पेपरमीलमध्येच कंत्राटी नोकरी सुरू केली. महिन्याचे जेमतेम सात-आठ हजार रुपये मिळायचे. २०१३ मध्ये अशोकचे लग्न झाले. दोन मुलीही झाल्या. मात्र परिस्थिती तशीच कायम होती किंबहुना अधिकच बिकट होत गेली. अंगात कुवत असतानाही असे रटाळ आयुष्य जगणे अशोकला आवडत नव्हते. काहीतरी करून दाखवायचे. परिस्थिती बदलायची, असे त्याने ठरविले. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, असा संकल्प केला. ध्येयासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी होती. जुलै २०१५ मध्ये सर्वप्रथम अशोकने नोकरी सोडली. अनेकांना हा निर्णय पायावर कुऱ्हाड मारल्यासारखा वाटला. मात्र तो डगमगला नाही. भविष्य निर्वाह निधीचे ९८ हजार रुपये मिळाले. हे पैसे दोन वर्ष पुरवायचे आणि या दोन वर्षात आपले ध्येय गाठायचे, असा त्याने दृढनिश्चिय केला. या दृढनिश्चियाला सामोरे जाणे सोपे नव्हते. पैसे असले की त्याला आपसुकच पाय फुटतात, असे म्हणतात. मात्र अशोकने काटकसर करीत पैशाचे व्यवस्थित नियोजन केले. यादरम्यान पूर्ण वेळ तो स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. बल्लारपुरातील सर्व ग्रंथालये पालथी घातली. सप्टेंबर २०१५ मध्ये तो चंद्रपूरला आला. येथील जिल्हा ग्रंथालयात भरपूर पुस्तके त्याला दिसली. तो आघाशासारखे सर्व पुस्तके वाचू लागला. बँकींग परीक्षेसाठी अर्ज भरू लागला. मात्र बँकींग परीक्षेसाठी इतिहास, भूगोलांचे पुस्तके वाचून उपयोग नाही, हे तेथीलच एका मित्राने त्याला पटवून दिले. मग अशोक नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करू लागला. यादरम्यान त्याच्या आईचेही कर्करोगाने निधन झाले. हा अशोकला मोठा हादरा होता. मात्र आपल्याकडे केवळ दोनच वर्ष आहेत, दिवसं भराभर सरताहेत, याची जाणीव त्याला होती. अश्रू गाळण्याला वेळ नव्हता. अशोक सकाळी ९ वाजता चंद्रपूरला यायचा. सायंकाळी ६ वाजता बल्लारपूरला परत जायचा. १० ते १२ तास तो अभ्यास करू लागला. प्रवासादरम्यान त्याचा अपघातही झाला. पाय मोडला. मात्र तशाही अवस्थेत त्याने अभ्यासाला फारकत घेतली नाही. २०१७ च्या अखेर त्याने आयबीपीएस श्रेणी-१ ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. ठरविलेल्या वेळेत आपले ध्येय पूर्ण केले. आता लवकरच अशोकची महाराष्ट्रात कुठेही पोस्टींग होणार आहे. मात्र त्याचा हा संघषर् प्रवास इतरांसाठी नवी ऊर्जा देणारा आहे.
जिल्हा ग्रंथालय जणू व्यासपीठच !
कलावंतांना चांगले व्यासपीठ मिळाले की ते पुढे जातात. कला बहरत जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी येथील जिल्हा ग्रंथालयाने जणू तसे व्यासपीठच उपलब्ध करून दिले आहे. वणी, जिवती, ब्रह्मपुरीसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील युवक-युवती येथे अभ्यासाला येतात. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेकडो तरुणांची येथे शाळाच भरते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे हे या धडपड्या तरुणांना पाहिजे ती मदत करतात. आस्थेने विचारपूस करतात, मायेची ऊब देतात. आपल्यालाही त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे अशोक सांगतो.