दिव्यांगांकडे समाजाने दुर्लक्ष करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:47 PM2018-04-07T22:47:46+5:302018-04-07T22:47:46+5:30
दिव्यांग हेदेखील समाजाचेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू असून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवाय, त्यांच्याप्रती समाज घटकांनी संवेदनशील असणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : दिव्यांग हेदेखील समाजाचेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू असून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवाय, त्यांच्याप्रती समाज घटकांनी संवेदनशील असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, असे मत वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी व्यक्त केले.
येथील दृष्टीहिन जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंध संगीतकार रविंद्र जैन यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून येथील बचत भवनात सावित्रीबाई फुले कन्या वसतिगृहाच्या मदतीसाठी नागपूर येथील रोशनी म्युजिकल नाईट कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष डी.पी. जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा वाचनालयाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, रेवाराम कवाडे, लक्ष्मण खापेकर, दिलीप गेडाम, अजय गुप्ता, नंदू किरणापुरे, स्नेहा भाटिया, सीमा लाकडे, आयोजक सतीश शेंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी दिव्यांग कलावंतांनी विविध प्रकारची गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान १८ वर्षांखालील दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रकेट संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटपटू उमर शेख यांचा सत्कार चंदेल यांच्या हस्ते करण्यात आला. दिव्यांगांच्या विविध योजनांचीही माहिती कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली. दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी राखून ठेवण्याचा शासनाचा नियम आहे, यावर उपस्थितांनी भाष्य केले.
डी.पी. जाधव, रेवाराम टेभूर्णीकर, लक्ष्मण खापेकर यांचाही सत्कार पार पडला. प्रास्ताविकातून संस्थेचे महासचिव सतीश शेंडे यांनी अंधांच्या वसतिगृहासाठी जागेची मागणी केली. दिव्यांगांच्या संगीतमय मेजवाणीचे रसिकांना चांगलीच भुरळ घातली. अंध कलावंतांनी गीत व नृत्याच्या अविष्कारातून रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले.