ज्येष्ठ नागरिकांची उपेक्षा करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:41 PM2018-10-03T22:41:12+5:302018-10-03T22:41:35+5:30
संयुक्त राष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम सुरू केले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कृतिआराखडा जाहीर केला. यानुसार प्रत्येक नागरिकाने उपेक्षा न करता ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक वनिता घुमे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : संयुक्त राष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम सुरू केले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कृतिआराखडा जाहीर केला. यानुसार प्रत्येक नागरिकाने उपेक्षा न करता ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक वनिता घुमे यांनी केले. उत्कर्ष पुरोगामी महिला व बालकल्याण संस्था बेलगाव (भू.) च्या वतीने पार पडलेल्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. झाडे, मधूकर लांडगे व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नागरिकांच्या सुख-दु:खाबाबत चर्चा केल्याने चेहऱ्यांवर समाधान दिसून आले.
वनिता घुमे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, खरी समस्या एकटेपणाची व कुटुंबातील नगण्य स्थानाची असते. या उतरत्या वयात मुले मोठी झाली की दूर होतात.
कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठांना स्थान नसते. त्यामुळे ते दु:खी होतात. अशा स्थितीत आनंदी जीवन कसे जगावे, यासाठी समाजातील जाणत्या नागरिकांनी विधायक उपक्रम राबविले पाहिजे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मधुकर लांडगे यांनी आभार मानले.