मतदानावर प्रभाव पडू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:13 PM2019-03-09T22:13:26+5:302019-03-09T22:14:43+5:30
लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी संबंधाने सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या सर्व समित्यांचे प्रमुखदेखील या बैठकीला हजर होते.
यावेळी प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन कशा प्रकारे करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले. एकदा आचारसंहिता अंमलात आली की अधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे व नियमानुसार आपल्या अधिकाराचे वहन करणे, निवडणूक काळामध्ये अतिशय आवश्यक असून उपलब्ध असणाºया कायद्यांचे प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
निवडणूक काळामध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाळणे, पदाधिकाऱ्यांकडून शासकीय यंत्रणेचा वापर होऊ न देणे, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या प्रचार साहित्याबाबत दक्षता घेणे, वाहनांचा योग्य वापर करणे तसेच या काळामध्ये राजकीय नेते व उमेदवारांपासून यंत्रणेने अलिप्त राहून काम करणे किती गरजेचे असते. हे आचारसंहितेतील नियमांचे दाखले देत त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी निवडणूक काळात आचार संहितेचे पालन करताना कायम पुढे येणारे प्रश्न व त्याचे निराकरण याबाबत मार्गदर्शन केले. आजच्या बैठकीतदेखील व्हीव्हीपॅट मशीन व मतदान संयंत्राचे प्रात्यक्षिक सर्व अधिकाºयांना देण्यात आले. उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांनी यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. मतदान पारदर्शी व निष्पक्षपणे कसे होणार, याचे प्रात्यक्षिकदेखील यावेळी दाखविण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच निवडणूक वेबसाईटवर असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी निवडणूक आयोगातर्फे अॅपदेखील सुरू करण्यात आले असून निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या अॅपवरील कोणत्याही आक्षेपाला शंभर मिनिटाच्या आत समाधानकारक उत्तर द्यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.