निकाल लागेपर्यंत लीज देऊ नका
By admin | Published: April 14, 2017 12:50 AM2017-04-14T00:50:58+5:302017-04-14T00:50:58+5:30
भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर उत्खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे.
प्रकरण अवैध उत्खननाचे : मुदत संपल्यावरही सुरू होते काम
चंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर उत्खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे. जमीन विकलेली नसतानाही जमिनीचा ताबा देण्यास भाडेकरू नकार देत असल्याने हे प्रकरण न्यायलयात सुरु आहे. त्यामुळे प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत उत्खननासाठी लीज देऊ नये, अशी मागणी नंदोरी (बु.) येथील शेतकरी व्यंकटेश एकरे, मुलगा धनंजय एकरे व अंकुश काळे यांनी केली आहे.
भद्रावती तालुक्यातील नंदोरी (खुर्द) येथील सर्व्हे नं. ७८ (जुना ७१) येथील शेतजमीन व्यंकटेश एकरे यांनी चंद्रकांत वासाडे यांना १९८१ ते १९९६ मध्ये भाडेपट्टयाने दिली होती. १९९७ पर्यंत भाडेपट्ट्याचे नुतनीकरण झाले. मात्र त्यानंतर नूतनीकरण न होताही वासाडे यांनी तत्कालीन खनिकर्म अधिकारी रामटेके यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे एप्रिल २००६ पर्यंत लीज काढून उत्खनन सुरू केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर शेतमालकाने खनिकर्म विभागाला पत्र देवून उत्खनन थांबविण्याची विनंती केली. चंद्रपूर न्यायालयात दिवाणी दावाही दाखल केला. हस्ताक्षरतज्ज्ञांकडून ही बाब तपासल्यावर खरा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी वरोरा पोलिसात २३ जानेवारी २००२ ला शेतमालकाने तक्रार दिली. त्यावर काहीच दखल न घेतल्याने पुन्हा २७ जुलै २००२ ला दुसरी तक्रार केल्यावर पोलिसांनी दखल घेतली व वासाडे यांच्यावर गुन्हे नोंदविले. या प्रकरणाचा फौजदारी खटला सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीतही चंद्रकांत वासाडे यांच्याकडून लीज मिळविण्यचा प्रयत्न केला जात आहे. उत्खनण करताना धुरा आणि डिमार्केशन करणे आवश्यक असते. मात्र उत्खननात शेताचा धुरा आणि अॅप्रोच रस्ताही आता अस्तित्वात नाही. कसलेही डिमार्केशन नसल्याने नेमके किती उत्खनन झाले याचा अंदाज येणे कठीण आहे. यामुळे त्यांना पुन्हा लीज दिल्यास नियमाचे उल्लंघन होऊन शासनाची लूट होण्याची शक्यता अधिक आहे. आपण स्वत: शेतगालक असून नियमित शेतसाराही भरत आहोत. २०१४ ला दिवाणी न्यायालयाने जमिनीचा ताबा शेतमालकांना देण्याचा निर्णय होऊनही दिला जात नसल्याने न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आहे. प्रशासनाने आपल्याला पुढील १५ दिवसांत न्याय न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा व्यंकटेश एकरे व मुलगा धनंजय एकरे यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)