स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:54 PM2018-02-19T23:54:30+5:302018-02-19T23:54:48+5:30

जिवती तालुक्यातील १३ घरांची वस्ती असलेल्या कोलाम पाटागुड्याला जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले. पंडित गुड्यापासून दीड ते दोन किमी अंतरावरील पाटागुड्यात जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही.

Do not tell us freedom ..! | स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही..!

स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही..!

Next
ठळक मुद्देकोलाम पाटागुड्याचा सवाल : रस्त्याअभावी २० वर्षांपासून दगडगोट्यातून काढतात वाट

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील १३ घरांची वस्ती असलेल्या कोलाम पाटागुड्याला जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले. पंडित गुड्यापासून दीड ते दोन किमी अंतरावरील पाटागुड्यात जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही. पारंपरिक शेतीसोबत मिळेल ती कामे करून पोटाची खळगी भरणाऱ्या अशिक्षित कुटुंबांचा हा जीवघेणा संघर्ष बघितला तर तथाकथित विकासकामांचे पितळ उघडे पडते. ‘स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही, कोण देतो ग्वाही भाकरीची...’ हा त्यांचा सवाल आहे.
ठक्करबापा योजनेअंतर्गत कोलाम गुड्यांचा विकास करण्यासाठी सरकारने जिल्हा प्रशासनाने अनेक योजना तयार केल्या. आत्मसन्मान वाढविणाऱ्या विविध योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. तर दुसरीकडे घर, रस्ता, शाळा, आरोग्य, शेतीची सुधारणा आणि हाताला बारामाही काम देवू असे आश्वासन देणाºया राजकीय नेत्यांनीदेखील रेंगेगुडा, सीतागुडा, पाटागुडा या कोलामगुड्यांचा सोईस्कर वापर करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. सत्तेचा मजला चढल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कोलामगुड्यांना विकासापासून जणू वाळीतच टाकल्याचा प्रत्यय येत आहे. यातीलच पाटागुडा हे प्रातिनिधीक उदाहरण ठरावे. पाटणपासून पंडितगुडा ओलांडले की पाटागुड्याची खडतर वाट सुरू होते. दीड- दोन किमी अंतरावरील या गुड्यामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ताच नाही. १२ ते १३ कुटुंब पारंपरिक शेती आणि मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. शासनाची घरकुल योजना सोडली तर अन्य योजनांचा या गावाला अद्याप स्पर्श झाला नाही. आजारी व्यक्तीला उपचार करावयाचे असेल तर खाटेवर मांडून दगडगोट्यांची वाट पार करुनच पुढे जावे लागते.
सहा ते सात कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात आले. छप्परपर्यंत बांधकाम पूर्ण झाले. परंतु, उर्वरीत सर्वच कामे ठप्प झाली आहे. घरकुल लाभधारक म्हणतात, घरकुल मिळाल्याने बरे झाले. पोराबाळांची आशा वाढली. पण, बांधकाम अर्धवट आहे. ही अडचण कधी दूर होणार, याची आम्ही वाट बघतोय.
वाट पाहण्यात गेली २० वर्षे !
शेतीची कामे संपल्यानंतर प्रपंच चालविण्यासाठी सर्वच कुटुंब अन्यत्र स्थलांतरण करतात. हंगाम संपल्यानंतर गुड्यात परत येतात. त्यानंतर पुन्हा भटकंती सुरू होते. निवडणूक आली तर की दुर्लक्षित इवल्याशा गुड्यात विविध पक्षांच्या नेत्यांचे पाऊल पडते. कोलामांनी रस्त्याचा विषय काढल्यास ‘यंदा होणारच’ अशी बतावणी करून नेते-कार्यकर्ते परागंदा होतात. या आश्वासनाला २० वर्षे झाल्याची खंत कोलाम समाज बांधवांनी व्यक्त केली. राहायला सुरक्षित घर व जगण्यासाठी साधन द्यावे, ही त्यांची मागणणी आहे.
पाणी मिळाले, पुढचे काय?
मागील २० वर्षांपासून पाटणगुडा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागत होते. जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले आहे. जवळच माणिकगड सिमेंट कंपनीची खाण आहे. या खाणीतून दिवस-रात्र स्फोटांचा आवाज येतो. गुड्याच्या भूगर्भातून खनिज संपत्तीचे उत्खनन करून सिमेंटद्वारे गगणाला भिडणाºया इमारती महानगरांमध्ये उभ्या होत आहेत. पण, येथील घरकुलांवर छप्पर चढले नाही. कंपनीने सीएसआर फंडातून सार्वजनिक शौचालय व पाणी पुरवठ्याची सुविधा करून दिली. परंतु, पोटाचा प्रश्न कायम आहे.
कोण देतो ग्वाही छप्परांची!
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला तरी रस्ते, नाल्या आणि व्यक्तिगत कल्याणकारी योजना गुड्यात पोहोचल्याच नाहीत. घरकुलाची कामे अर्धवट असून नागरिक बांबूचे तट्टे व कुडाच्या भिंती उभारलेल्या झोपड्यांमध्ये दिवस ढकलत आहेत. दिवा अथवा कंदिलाच्या प्रकाशात आयुष्यातील उजेड शोधणारी माणसे दारिद्रयाशी निकराने संघर्ष करीत आहेत. दरम्यान, वीज वितरण कंपनीने दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी सौभाग्य योजना सुरू केली. यातून १०० टक्के अनुदानावर वीजमीटर लावून देण्यात आले. विजेची यंत्रसामग्री पहाडावरील पाटणगुड्यावर नेताना बैलबंडीचा आधार घेण्यात आला. घरकुलांची कामे अर्धवट आहे. मात्र, अस्वस्थ करणारा अंधार पाहून उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड व कनिष्ठ अभियंता विनोद भलमे यांनी छप्पर नसलेल्या घरांना वीज मीटर लावून दिले. त्यामुळे अन्य योजनांचा थांगपत्ता नसलेल्या कोलाम गुड्यातील नागरिक वीज कंपनीचे कौतुक करताना दिसून आले.

Web Title: Do not tell us freedom ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.