बँक खाते उघडण्यास अडवणूक करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:20 AM2017-10-25T00:20:50+5:302017-10-25T00:21:01+5:30
वयोवृद्ध निराधारांना श्रावण बाळ व संजय गांधी योजनेंतर्गत योजनांचा लाभ घेणाºया नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वयोवृद्ध निराधारांना श्रावण बाळ व संजय गांधी योजनेंतर्गत योजनांचा लाभ घेणाºया नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे बँकेचे खाते उघडताना १ हजार रुपयांची अट लादू नये, अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (भाकप) स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मासिक ६०० रुपये शासनाकडून दिल्या जाते. या योजनांचा प्रमुख उद्देश म्हातारवयात ज्यांचे कुणीही पालन पोषण करीत नाहीत, अशा लोकांना म्हातारवयात जगण्यासाठी मदत देणे हा आहे. आजच्या काळात ६०० रुपये मध्ये एका व्यक्तीला जीवन जगणे कठीण आहे, असे असताना स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मुळझातर्फे वयोवृद्ध निराधारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये खात्यात ठेवावे तसेच नव्या खात्यासाठी तेवढ्याच रक्कमेची अट लागू केली. काही खातेधारकांना रक्कम जमा ठेवण्यासंबंधात नोटीस देण्यात आली आहे. हे केवळ चुकीचे नसून बेकायदेशीर आहे. त्यामुळे हैराण झालेल्या बोडधा, कुडेसावली, मुडझा, हळदा व बलारपूर परिसरात शेकडो निराधारानी भारतीय कम्युनिस्ट पाटीच्या नेतृत्वात सोमवारी मुडझा येथील स्टेट बँकेला भेट देऊन शाखा प्रबंधक मानापुरे यांना निवेदन दिले.
निराधारांच्या लाभासोबतच शासनाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शिष्यवृत्तीसाठी अनुदान दिले जाते. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते उघडणे अनिवार्य झाले. त्यामुळे शासनाच्या अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी बँक खाते उघडले. परंतु बँकेच्या व्यवस्थापकाने सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना ५०० रुपये खात्यामध्ये जमा करावयास लावले. त्यानंतर बँकेने खात्यामध्ये अपुरी रक्कम जमा आहे. इतर कारणे सांगून विद्यार्थ्यांच्या खात्यातील जमा रकमेमधून पैसे कापले, असा आरोप विनोद झोडगे यांनी केला. गरीबांची मुले शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे गणवेश घ्यायला पैसे नाहीत. शासनाकडून अनुदान दिले जात.े पण गरीबांना आपल्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी बाध्य करीत आहेत. एकीकडे शासनाकडून मिळणारा अनुदान आतापर्यंत बँक खात्यात जमाच झाला नाही. उलट बँक व्यवस्थापकाने पालकांनी खात्यामध्ये भरलेल्या ५०० रुपयांमधून वेगवेगळे चार्जेस लावून रक्कम कापून घेतली जात आहे. याकडे बँकेचे व्यवस्थापक मानापूरे यांच्या लक्षात आणून दिले. परिणामी, यापुढे वयोवृद्ध निराधारांना बँक खात्यामध्ये एक हजार रुपये जमा करण्याची सक्ती करण्यात येणार नाही. संपूर्ण पैसे काढून घेता येईल. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून कपात करणार नाही. पालकांनाही खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सक्ती होणार नाही, असे आश्वासन दिले.