पोर्टबिलिटी करा आणि उचला आवडीच्या राशन दुकानातून धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:51+5:302021-06-04T04:21:51+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन केले आहे. काही जिल्ह्यात लाॅकडाऊन शिथिल ...
चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन केले आहे. काही जिल्ह्यात लाॅकडाऊन शिथिल झाले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही कोणतेही आदेश नाही. दरम्यान, नागरिकांच्या सुविधेसाठी रेशन पोर्टबिलिटी योजना असून, या योजनेंतर्गत कोणत्याही राशन दुकानातून नागरिकांना लाभ घेता येणार आहे. मात्र यासाठी आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाने ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ या योजनेंतर्गत काही राज्यांसोबत आंतरराज्य पोर्टबिलिटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलता येणार आहे. यासाठी त्यांच्याजवळ ज्या गावातील रहिवासी आहे त्या गावातील रेशनकार्ड असणे गरजेचे आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ५पर्यंत राहणार सुरू
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांनी ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच, सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेतच दुकाने उघडे ठेवावे लागणार आहे. धान्य वाटप करताना ई-पॉस मशीनवर प्रत्यक्ष कार्डधारक लाभार्थ्यांचा अंगठा लावायचा नाही.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनेच्या रेशन कार्डधारकांना धान्य मिळणार आहे. तसेच केशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्यात येणार आहे. मात्र जे कार्डधारक प्रथम जाईल, त्यांनाच ते मिळणार आहे.