फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी करा नियमीत व्यायाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:04+5:302021-05-07T04:30:04+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय स्तरावरून ...
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून जनजागृती सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यायाम कसा करावा, यासाठी चित्रफीत काढण्यात आली असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली जात आहे.
सदर चित्रफीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून काढण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या फिजिओथेरपिस्ट डाॅ. भारती गणवीर, डाॅ. साईमा रुबी तसेच प्रणाली पांडे यांनी या माध्यमातून नागरिकांना व्यायाम करण्याची प्रात्यक्षिके करून दाखविली. या चित्रफितीमुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नक्कीच फायदा होईल, असा विश्वास मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला आहे.
बाॅक्स
असे आहेत व्यायामाचे प्रकार
१ -आरामशीर श्वास घेण्याची पद्धत
यामध्ये एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवून नाकाद्वारे लांब श्वास घ्यायचा आहे आणि अगदी हळुवार सोडायचा आहे. असे करताना आपले दोन्ही हात श्वास घेताना वर येतील आणि श्वास सोडताना खाली जातील. यामुळे आपला श्वासोच्छ्वास सुरळीत होण्यास मदत होते आणि श्वसनमार्ग मोकळा होताे. हा व्यायाम १० ते १५ वेळा करायचा आहे.
२ - निमूटपणे श्वास घेण्याची पद्धत
हा व्यायाम करताना अगदी निवांत बसायचे आहे. त्यानंतर हळूहळू लांब श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर चहाला फूक मारतो तसा हळूहळू सोडायचा आहे. यामुळे शरीरातील कार्बोनरिच गॅसेस हळूहळू वर यायला लागेल त्यामुळे दमा, थकवा कमी यायला लागतील.
३ - हा व्यायाम करताना नाकाद्वारे श्वास घेऊन ३ ते ५ मोजतपर्यंत श्वास रोखून ठेवायचा आहे. त्यानंतर हळूहळू तोंडाद्वारे सोडायचा आहे. यामुळे फुफ्फुसातील खालच्या भागात जमा तसेच घट्ट झालेले स्राव बाहेर येण्यास मदत होते.
४ -वक्षगतिक्षिलता वाढविण्याचा व्यायाम
हा व्यायाम करताना लांब श्वास घेतानाच दोन्ही हात वर घ्यायचे आहे आणि श्वास सोडताना दोन्ही हात खाली आणायचे आहेत. त्यामुळे
बरगड्यांचा पिंजरा हळूहळू उघडायला मदत होते. यामुळे फुफ्फुसात हवेचा प्रभाव वाढतो.
५- पालथे झोपणे
रक्तातील ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी पोटाच्या आणि छातीच्या भारावर झोपून दीर्घ श्वसन केल्यास आपल्या फुफ्फुसातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
बाॅक्स
दिवसातून करा दोन ते तीन वेळा व्यायाम
सदर व्यायाम कुठल्याही वयोगटातील नागरिक करू शकतील. कोरोना झालेले, आजारातून बरे झालेले तसेच तंदुरुस्त नागरिकही आपल्या क्षमतेनुसार हा व्यायाम करू शकतील. दिवसातून दोन ते तीनवेळा व्यायाम केला तरी चालेल. कुठल्याही वयोगटातील नागरिक हा व्यायाम करू शकतील.