‘ति’च्यासाठी डॉक्टर अन् पोलीस ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:39 PM2021-11-29T17:39:02+5:302021-11-29T18:14:30+5:30
तिचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शुद्ध हरपली. ती चार ते पाच दिवस बेशुद्ध होती. तसेच जवळपास १३ दिवस रुग्णालयात भरती होती. तिच्याजवळ कुणी नसल्याने उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका हे तिचे नातेवाईक झाले.
चंद्रपूर : वाटेत अपघात झाला. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे तिची शुद्ध हरपली. काहींनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. जवळ ना कुणी नातेवाईक ना मित्र. अशाही स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या चमूने योग्य उपचार करून तिला बरे केले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला अन् तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. अगदी चित्रपटात घडणारे कथानक चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकतेच समोर आले. यातून डॉक्टर व पोलिसांच्या माणुसकीचा परिचय सर्वांना झाला.
यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील अर्चना इंदरवाडे चंद्रपूरला आली असता १३ नोव्हेंबर रोजी पडोली मार्गावर तिचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शुद्ध हरपली. पाहणाऱ्यांनी तिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. तिच्याजवळ कुणी नातेवाईक नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. तीन ते चार दिवसांनंतर ती शुद्धीवर आली. परंतु डोक्याला मार असल्याने ती पूर्णपणे बरी होईपर्यंत डॉक्टरांच्या चमूने तिच्यावर उपचार सुरूच ठेवले.
ती पूर्णपणे बरी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिची आस्थेने चौकशी केली. तिने आपले नाव अर्चना इंदरवाडे (रा. अकोला बाजार) असे सांगितले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांच्या मार्गदर्शनात समाजसेवा अधिकारी (वैद्यकीय) भास्कर झळके, समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे, हेमंत भोयर व त्यांच्या चमूने यवतमाळ येथील पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करुन तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यानंतर तिचा भाऊ रवींद्र कुंभेकार याला बोलवून तिला घरी पाठविण्यात आले. डॉक्टरांची ही माणुसकी बघून अर्चना व तिच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
डॉक्टरांचा चमू ठरले तिचे नातेवाईक
अर्चना चार ते पाच दिवस बेशुद्ध होती. तसेच जवळपास १३ दिवस रुग्णालयात भरती होती. तिच्याजवळ कुणी नसल्याने उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका हे तिचे नातेवाईक झाले. तिला काय हवे काय नको, वेळेवर जेवन व गोळ्या सुद्धा रुग्णालयातील कर्मचारी करीत होते. त्यामुळे अर्चनाला सुद्धा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा स्टॉप नातेवाईकच वाटू लागले होते.