डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवस म्हणजे सोनियाचा दिनू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 05:57 PM2022-11-08T17:57:28+5:302022-11-08T17:58:15+5:30

Chandrapur News डॉ. विकास आमटे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात आनंदवन मित्रमंडळ महाराष्ट्र आणि डॉ. विकास आमटे अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे मंगळवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.

Doctor Vikas Amte's birthday is memorable day | डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवस म्हणजे सोनियाचा दिनू

डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवस म्हणजे सोनियाचा दिनू

Next
ठळक मुद्देडाॅ. विकास आमटे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

चंद्रपूर: श्रद्धेय बाबांनी पाहिलेले स्वप्न आज डाॅ. विकास आमटे यांनी प्रत्यक्षात उतरवलेले आहे. जातविरहित समाज हा बाबांचा अजेंडा अंध, अपंग, कुष्ठरोगी यांच्या सेवाकार्यातून डॉ. विकास आमटे यांनी पूर्णत्वास नेला. आनंदवन आज त्यांनी विश्वाच्या बिंदूवर नेऊन ठेवले आहे. त्यांचा वाढदिवस हा आज सोनियाचा दिवस आहे, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांनी काढले. डॉ. विकास आमटे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात आनंदवन मित्रमंडळ महाराष्ट्र आणि डॉ. विकास आमटे अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे मंगळवारी आयोजित अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. तात्यासाहेब लहाने, आयोजन समितीचे दगडू लोमटे नरेंद्र मिस्त्री उपस्थित होते. डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशाचे वाचन केले. आयोजन समितीच्या वतीने याप्रसंगी महारोगी सेवा समिती आनंदवनला २० लाख ७५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांच्या हस्ते डॉक्टर विकास आमटे व डॉक्टर भारती आमटे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ७५ लेख असलेल्या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. विकास आमटे म्हणाले, दोन वर्षांपासून आनंदवनातील अनेक कार्यक्रम कोरोनामुळे ठप्प झाले होते. ते सुरू करण्याचा मानस व्यक्त करत, आई कधीही संपावर जात नाही, तसे आनंदवनाचे आहे. ११९ कायदे कुष्ठरोग्यांच्या विरोधात आहे. ते बदलवा, असे सुप्रीम कोर्ट सांगत आहे; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. जन्म झाला, डोळे उघडले, तेव्हापासून कुष्ठरोगी बघत आलो. त्यामुळे त्यांच्याकरिता व दीनदुबळ्यांकरिता काम करण्याची मनातून इच्छा झाली व ते काम अविरतपणे सुरू केले.

मानपत्राचे वाचन मधुरा वेलणकर यांनी केले. प्रास्ताविक आयोजन समितीचे दगडू लोमटे यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य राधा सवाने व प्राध्यापक मोक्षदा मनोहर यांनी केले. आभार नरेंद्र मिस्त्री यांनी मानले. आनंदवन निर्मित स्वरानंदवन ऑर्केस्ट्राच्या चमूने गायलेल्या ‘श्रृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. अनेक सामाजिक संघटनांनी डॉ. विकास आमटे यांचा सत्कार केला.

क्षणचित्रे

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांनी आनंदवनला एक लाख रुपयांचा निधी दिला.

प्रल्हाद ठक यांनी विविध धान्यातून काढलेले डॉ. विकास आमटे यांचे छायाचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

डॉ. विकास आमटे यांनी केलेल्या कार्याचे चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते.

सभागृहात बांबूची सजावट लक्ष वेधून घेत होती.

Web Title: Doctor Vikas Amte's birthday is memorable day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.