वन कार्यालयातील दस्तऐवज जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:45 PM2017-09-08T23:45:21+5:302017-09-08T23:45:39+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली.
राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली. महत्त्वाची कागदपत्रे व सामान असताना त्याची देखभाल करण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे हजारो रुपयांच्या साहित्यांसह महत्त्वाचे दस्तऐवज जळाले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मूल येथे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे असून त्यांच्याकडे विशेष व्याघ्र दलाचादेखील प्रभार आहे. वन्यप्राण्यांच्या निगडीत महत्त्वाचा कारभार असताना ते केव्हाच जंगलात फिरताना दिसत नाही. त्यामुळे जंगलातील बांबूची फार मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यापासून ताटव्याची तस्करी केल्याचा प्रकार लोकमतने यापूर्वीच उजेडात आणला आहे. मात्र पुढे या प्रकरणात त्यांना ‘अभय’ देण्यात आले. दरम्यान, गुरुवारी त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महत्त्वाचे दस्ताऐवज व सामान जळाले. त्या सदनिकेत वीज पुरवठाच नसल्यामुळे शार्ट सर्कीटचा प्रश्नच निर्माण होत नाही. यात कुणीतरी आग लावली असल्याची चर्चा वनविभागात दबक्या आवाजात सुरू आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय मूल येथे रात्रपाळीत एकनाथ कालेश्वरराव या वनमजुराला ठेवण्यात आले होते. त्या वनमजुराने रात्रीच्या वेळेस एका वन कर्मचाºयाला डिझेल चोरून नेताना बघितले होते. ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांना सांगिल्यानंतर एकनाथ कालेश्वरराव यांची बदली करून त्या जागेवर मद्यप्राशन करणाºया वनमजुराला नेमण्यात आले. यावरून कुंपनच शेत खात असावे, अशी चर्चा आहे. गुरुवारी जळालेल्या दस्ताऐवजात काही वन्यप्राण्यांचे चामडेदेखील असल्याची चर्चा आहे. अर्धवट जळालेले वन्यप्राण्यांचे चामडे घाई गडबडीत नेवून इतरत्र ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. वनविभागाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह आहे.