दारू घेता का दारू ?
By admin | Published: September 25, 2016 01:19 AM2016-09-25T01:19:45+5:302016-09-25T01:19:45+5:30
दारू घेता का दारू! एका हातात दारूच्या बाटल्या असलेला थैला आणि दुसऱ्या हातात दारूची एक शिशी.
फुकट घ्या नाहीतर शंभर रुपयात घ्या
पोलिसांनी केली अटक : दारूविक्रेत्याची सुरु होती आरडाओरड करून दारूविक्री
वरोरा : दारू घेता का दारू! एका हातात दारूच्या बाटल्या असलेला थैला आणि दुसऱ्या हातात दारूची एक शिशी. मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या या दारू विक्रेत्याला दारू म्हणजे भाजीपालाच, अशा पद्धतीने मोठमोठ्याने आरडाओरड करीत रस्त्याने दारू घेता का दारू, असे विचारात असताना काही नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगताच पोलिसांनी त्याला अटक केली.
आठवडी बाजारात गेल्यावर किरकोळ भाजी विक्रेते आरडाओरड करून भाजीपाला विक्री करताना दिसतात. ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा त्यांचा अंदाज असतो. पण जिल्ह्यात दारूबंदी असताना खुलेआम दारू विक्री करीत होता. एवढेच नाही तर दारू विक्री व्यवसायात नवीन असल्याने आरडाओरड करून ग्राहकांना आपल्याकडे दारू असल्याची माहिती देत आकर्षित करीत होता. या रस्त्याने फिरणाऱ्या दारू विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली असून मुंबई दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली . शहरातील मालवीय वॉडार्तील रहिवासी रामप्रसाद माछो बेहरा(३२) हा आपल्या परिवारासह मालवीय वॉर्डातच राहतो. काही दिवसांपूर्वी घरघुती भांडणातून पत्नी माहेरी म्हणजेच वॉर्डातीलच आई वडिलांच्या घरीे निघून गेली. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रामप्रसाद बेहरा याने घरातील टेबल पंखा विकून दारूचा व्यवसाय सुरु केला. सासू-सासऱ्यांच्या घरासमोर जोरजोराने आरडाओरड करीत ‘दारू लो, दारू फुकट लो. नही तो सौ रुपये मे लो’, अशी ,ओरड करीत दारू विक्री करीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली . (तालुका प्रतिनिधी)