कोणी कोविड प्रतिबंधाची लस देता का लस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:56+5:302021-05-04T04:11:56+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, मृतकांची संख्याही भयानक आहे. त्यामुळ नागरिक आता कोविड-१९ प्रतिबंधक लसीकडे संजीवनी म्हणून केंद्रांकडे धाव ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, मृतकांची संख्याही भयानक आहे. त्यामुळ नागरिक आता कोविड-१९ प्रतिबंधक लसीकडे संजीवनी म्हणून केंद्रांकडे धाव घेऊ लागले. जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कुणी लस घ्यायला तयार नव्हते. केंंद्रातील कर्मचाऱ्यांना सायंकाळी ५ वाजतापर्यंत वाट पाहावी लागत होती. ग्रामीण भागात लसीबाबत अनेक अफवाही पसरविण्यात आल्या. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करच लस घेताना पहिल्या टप्प्यात दिसून आले. मार्च महिन्यात मात्र चित्र बदलले. शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला. परिणामी, नागरिकांमध्ये दहशत पसरली. ज्यांनी लस घेतली. त्यांना कोरोना होऊनही आरोग्यात गुंतागुंतीची समस्या निर्माण झाली नाही, असा निष्कर्ष जिल्हा आरोग्य यंत्रणा व वैद्यकीय तज्ज्ञांनी जाहीर केला. माध्यमांमधून ही माहिती ग्रामीण भागात पसरताच लस घेण्यासाठी केंद्रासमोर प्रचंड गर्दी होऊ लागली. चंद्रपूर शहरात तर सुरुवातीला नोकरदार, व्यावसायिक मध्यवर्गीय नागरिकच लस घेताना दिसून आले. पण सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांमध्येही कोरोनाची लागण झाल्याने हा समुदाय लसीकरणासाठी केंद्रात रांगा लावू लागली. परंतु, केंद्र सरकारकडून राज्याला पुरेसे डोस मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्र बंद ठेवावे लागत आहे. ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांसाठी या आठवड्यात चंद्रपूर शहरात दोन स्वतंत्र केंद्र सुरू केले. पण, प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस देण्यात आल्याने अनेकांना घरी परत जावे लागले.
कोणी काय करायचे?
६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन व जिल्ह्यात चार केंद्र तयार तयार केले जात आहेत. केंद्र निश्चित झाल्यानंतर मनपा प्रशासन लसीकरणाचे वेळापत्रक नगरसेवकांमार्फत जनतेकडे पोहोचते. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांशी संपर्क साधावा. ग्रामीण भागात अशी व्यवस्था नाही.
४५ वर्षांवरील नागरिकांसाठीदेखील मनपा हीच पद्धत वापरत आहे. सध्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यात दोन दिवस लसीकरण होऊ शकेल, एवढाच साठा आहे. डोस जादा मिळालेच तर आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली जाते. नागरिकांनीच जागरूक राहून जि. प. लसीकरण अधिकाऱ्यांशी संवाद साधावा.
१८ वर्षांवरील तरुणाईचा हिरमोड
डोस नसल्याने जिल्ह्यात मंगळवारपासून लसीकरण बंद होऊ शकते. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी मोहीम सुरू झाली. पण, डोस नाहीत. त्यामुळे चंद्रपुरातील मनपा प्रशासन व ग्रामीण भागातील तरुणाईने ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा.
कोणाला पहिला मिळेना, तर कोणाला दुसरा !
मी दोन दिवसांपासून केंद्रात चकरा मारत आहे. बाबूपेठ येथील केंद्रात १५० लस होत्या. रांगेत लागलो, पण कुपन संपल्याने मला परत यावे लागले. मला पहिला डोसही घेता आला नाही.
-शंकर तिमांडे, बाबूपेठ, चंद्रपूर
अंचलेश्वर वॉर्डातील राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेत लस घेण्यासाठी गेली होती. २०० लोकांची रांग दिसली. मी महिलांच्या रांगेत लागले. माझा नंबर येईपर्यंत लस संपली. लस आल्यानंतर या असे सांगण्यात आले.
-निर्मला चौधरी, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर
रामनगर येथील रामचंद्र प्राथमिक शाळेत दुसरा डोस घेण्यासाठी चार दिवसांपासून जात आहे. पण, मला लस मिळाली नाही. डोस कमी येतात आणि घेणारे जास्त असतात. सरकारने ज्येष्ठांची अशी निराशा करू नये.
-प्रभाकर हिवसे, रामनगर, चंद्रपूर
कोट
नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्रनिहाय वितरण केले जाते. त्यानंतर कोणत्या केंद्रावर लस मिळते, याची माहिती प्रसारित केले जाते. सध्या पुरेसा साठा नाही. पण, बुस्टर डोस घेणाऱ्यांसाठी काही ठिकाणी स्वतंत्र केंद्र सुरू आहेत. डोस उपलब्ध झाल्यानंतर सर्वच केंद्रांवर लसीकरण केल्या जाते.
-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर