कुणी मोबाईल देता का मोबाईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 05:00 AM2021-07-09T05:00:00+5:302021-07-09T05:00:03+5:30
कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे; परंतु निम्म्या विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहचत आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाईल शेतात आणि विद्यार्थी घरी अशी परिस्थिती आहे. परिसरातील नामांकित खासगी शाळा तसेच जिल्हा परिषद शाळेतून गृहपाठ तसेच सेतू अभ्यासक्रम शाळेचा वॉट्सॲप समूहावर पाठवून शिक्षण पूर्ण केले जात आहे.
राजेश बारसागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. मागील वर्षी शाळा -महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाइन सुरू होते. मात्र यातील केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहचले. उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याची माहिती पुढे आली आहे. नागभीड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे हलाखीची परिस्थिती असल्यामुळे स्मार्टफोनच नाही. ज्यांच्या घरी एक मोबाईल आहे त्याठिकाणी दोन मुले शिक्षण घेत आहेत, त्यांनाही अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकंदरीत मागच्या वर्षीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. यंदा पुन्हा ऑनलाइन शिक्षणाने शिक्षकांसह पालकांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी ‘कुणी मोबाईल देता काय मोबाईल’, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.
कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे; परंतु निम्म्या विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहचत आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाईल शेतात आणि विद्यार्थी घरी अशी परिस्थिती आहे. परिसरातील नामांकित खासगी शाळा तसेच जिल्हा परिषद शाळेतून गृहपाठ तसेच सेतू अभ्यासक्रम शाळेचा वॉट्सॲप समूहावर पाठवून शिक्षण पूर्ण केले जात आहे.
मात्र इतर विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, अशा विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी अडचणी येत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पाठविणे अवघड जात आहे.
ऑनलाईन शिक्षणातील अडचणी
१. ग्रामीण भागातील पालकांकडे मोबाईल आहेत तर त्या भागात मोबाईलचे नेटवर्क नाही.
२. पालकांना दीक्षा ॲप व इतर माध्यमाची माहितीच नाही. शाळा बंद शिक्षण सुरू अशा अभ्यासमालेची माहिती नाही.
३. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होते.
४. ग्रामीण भागात बरेचदा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मोबाईलची बॅटरी पुरत नाही.
ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. तसेच ज्या पालकांकडे स्मार्टफोन (अँड्रॉइड मोबाईल) आहे, अशा ठिकाणी इंटरनेट सेवा पोहचत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
- संतोष नन्नावार,
उपक्रमशील शिक्षक,
लोक विद्यालय तळोधी(बा), ता. नागभीड जि. चंद्रपूर
इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असते. तसेच आमच्या ग्रामीण परिसरात मोबाईलचे इंटरनेट नेटवर्क नेहमीच कमी असते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.
- विनोद शेंडे, पालक, जनकापूर ता. नागभीड, जि. चंद्रपूर