श्वानाचा मूत्रमार्ग बंद करून सोडले मृत्यूच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:50+5:302021-03-26T04:27:50+5:30
चंद्रपूर : प्राण्यांवर दया करा असा संदेश आपल्याला सातत्याने दिला जातो. या प्राण्यांशिवाय पर्यावरणाचे चक्र पूर्ण होऊ शकत नाही. ...
चंद्रपूर : प्राण्यांवर दया करा असा संदेश आपल्याला सातत्याने दिला जातो. या प्राण्यांशिवाय पर्यावरणाचे चक्र पूर्ण होऊ शकत नाही. असे असले तरी आजही समाजात असे काही नागरिक आहे, त्यांना मूक प्राण्यांना त्रास देण्यातच धन्यता वाटते. यामध्ये अनेकवेळा त्रास होऊन त्यांचा जीवही जातो. अशीच निर्लज्जतेचा कळस गाठणारी घटना मंगळवारी चंद्रपुरात घडली. काही टवाळखोरांनी एका मोकाट श्वानाचा मूत्रमार्ग दोरी बांधून बंद केला. आणि त्या श्वानाला सोडून दिले. यामुळे तो श्वान लघुशंका करू शकत नसल्याने सैरावैरा पळत होता. कुणीतरी केलेले हे अश्लाघ्य कृत्य बघून अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी प्यार संघटनेला दिली. प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी लगेच धाव घेतली. रेस्क्यू ऑपरेशन करून त्या श्वानाला पकडले. संस्थेत आणून मूत्र मार्गावर बांधलेली दोरी सोडून त्या श्वानाला जीवदान दिले.
-कोट
निष्पाप प्राण्यांना त्रास देण्यास काय समाधान मिळते, कळत नाही. समाजातील नागरिकांनी या प्राण्यांसाठी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. असे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. त्यामुळे असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही.
- देवेंद्र रापेल्ली
अध्यक्ष, प्यार फाउंडेशन