बल्लारपूर, चंद्रपूर, माजरी येथील रेल्वे भूखंडावरील कुटुंबांना बेघर करू नका - सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 03:15 PM2022-04-13T15:15:39+5:302022-04-13T15:19:19+5:30
नागरिकांना बजावलेली अतिक्रमण नोटीस मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूर :रेल्वेने ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या व स्थायिक झालेल्या नागरिकांना बेघर करण्याच्या दृष्टीने नोटीस बजावणे हे अत्यंत दुःखदायी असून या कुटुंबांना दिलासा देण्यात यावा. अतिक्रमणाची कारवाई मागे घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या विभागीय प्रबंधक ऋचा खरे यांना केली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात आ. मुनगंटीवार यांनी खरे यांची भेट घेतली.
चंद्रपूर येथील दूध डेअरी परिसर, बल्लारपूर शहरातील शांतीनगर आणि भद्रावतीच्या माजरी खदान येथील रेल्वे भूखंडावर गेल्या ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बजावलेली अतिक्रमण नोटीस मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली. बैठकीला आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपमहापौर राहुल पावडे, प्रकाश धारणे, काशी सिंग, निलेश खरबडे, अशिष देवतळे तसेच जलनगर चंद्रपूर आणि शांतीनगर बल्लारपूर येथील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.
मूलभूत सुविधा असून कर ही वसुली
या भूखंडांवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्याकडून नियमितपणे कर वसुली ही होत आहे. अशात त्यांना अचानकपणे हटविल्यास या नागरिकांच्या उदरनिर्वाह, वास्तव्य व भविष्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती, याकडे आ. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.