हाॅटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:33+5:302021-07-17T04:22:33+5:30
चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवस हाॅटेल बंद होते. आता हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश जण ...
चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवस हाॅटेल बंद होते. आता हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश जण हाॅटेलमधील पदार्थ खाण्याकडे लक्ष देत आहे. मात्र पावसाळा असल्यामुळे साथरोग पसरण्याची भीती आहे. उघड्यावर असलेले अन्नपदार्थ सेवन केले, तर डायरिया, गॅस्ट्रोसारखे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिभेचे लाड पुरवताना, जसा सांभाळून, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ऋतू बदलले की आरोग्यावरही परिणाम पडतो. यामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये अनेक आजार तोंड वर काढतात. त्यामुळे या काळामध्ये गरम आणि स्निग्ध आहार घेतला पाहिजे. पालेभाज्या खरेदी करताना त्या पाहून घेतल्या पाहिजेत. याशिवाय तेलकट, मसालेदार पदार्थ या दिवसात कटाक्षाने टाळले पाहिजेत.
कोरोना संकटानंतर आता प्रशासनाने हाॅटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दुपारी ४ वाजेनंतर पार्सल सुविधा आहे. मात्र सध्या हाॅटेलमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. याचवेळी अस्वच्छतेच्या वातावरणातही अनेकजण अन्नपदार्थ घेत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भभवण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये चटपटीत खाणे टाळले, तर आरोग्य उत्तम राहील, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
पावसाळ्यात हे खायला हवे...
पावसाळ्यामध्ये हलके अन्न सेवन केले पाहिजे
ताजे अन्न रोजच्या आहारामध्ये असले पाहिजे
स्निग्ध आहार घेतला पाहिजे, यामध्ये ताक सेवनात असावे
जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.
रात्रीच्या जेवनात हलक्या आहाराचा समावेश करावा
बाजारात उपलब्ध फळे खावीत
बाॅक्स
पावसाळ्यात हे खाणे टाळावे...
जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे
शिळे अन्न, शिळा भात खाऊ नये
उघड्यावरील चटपटीत पदार्थ खाऊ नयेत
तेलकट पदार्थ आणि मसालेदार पदार्थ टाळावेत
अस्वच्छ पाणी पिणे टाळावे
बाॅक्स
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळ्याच्या दिवसात माशा तसेच डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. घाणीवरील माशा उघड्यावरील अन्न पदार्थांवर बसल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच जुलाब, उलटीची समस्या जाणवू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील उघड्यावर असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. बाहेरील अस्वच्छ पाणी पिणेही पोटाच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते.
कोट
डाॅक्टर म्हणतात...
पावसाच्या दिवसांमध्ये जलजन्य आजाराचा अधिक धोका असतो. त्यामुळे स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. बाजारातून आणलेल्या भाज्या तसेच फळे स्वच्छ धुवावेत. जंकफूड टाळले पाहिजे. स्वच्छतेवर अधिक भर असायला पाहिजे. ताजे अन्न खायला हवे.
- डाॅ. गोपाल मुंधडा, चंद्रपूर
कोट
पावसाच्या दिवसांमध्ये हलके, सहज पचणारे आणि गरम अन्न सेवन केले पाहिजे. या काळामध्ये तेलकट पदार्थ, शिळे अन्न खाण्याचे टाळले पाहिजे. पालेभाज्या स्वच्छ धुऊन घेतल्या पाहिजेत. विशेषत: उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
- डाॅ. सौरभ राजूरकर, चंद्रपूर
-