मुक्त विद्यापीठात फलज्योतिषचा अभ्यासक्रम सुरू करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:30+5:302021-07-09T04:18:30+5:30
अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी सिंदेवाही : भारतीय संविधानाच्या ‘कलम ५१ ए-एच’नुसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद व ...
अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी
सिंदेवाही : भारतीय संविधानाच्या ‘कलम ५१ ए-एच’नुसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद व पर्यावरणाविषयी आवड निर्माण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या उद्दिष्टांचा आधार घेऊनच आपला अभ्यासक्रम ठरविला जातो. असे असतानादेखील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फलज्योतिष’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फलज्योतिष हे शास्त्र नाही, असे जगभरातील १८६ शास्त्रज्ञांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करू नये, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केली आहे.
फलज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करून हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना दैववादी बनविणार आहे की काय?, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अवैज्ञानिक, अचिकित्सक अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सिंदेवाहीचे नायब तहसीलदार डी. जे. धात्रक यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे केली आहे. या निवेदनात स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलज्योतिषविरोधी मतांचादेखील उल्लेख केला आहे. असा अभ्यासक्रम सुरू करून समाज अज्ञानाच्या खाईत लोटला जाईल, असेही या या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देताना अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, सिंदेवाही तालुका संघटक डेकेश्वर पर्वते, तालुका सचिव मोरेश्वर गौरकार, तालुका अध्यक्ष अंबादास मेश्राम, कोषाध्यक्ष तामदेव कावळे, महिला संघटिका राजश्री वसाके तथा सल्लागार मा. एन्. एम्. सोनुले प्रामुख्याने उपस्थित होते.