ग्रामीण या शब्दाचा न्यूनगंड बाळगू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:30 AM2021-02-09T04:30:49+5:302021-02-09T04:30:49+5:30
आवाळपूर : शारीरिक सुदृढतेसाठी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील युवक हा अधिक सुदृढ आणि सक्षम ...
आवाळपूर : शारीरिक सुदृढतेसाठी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील युवक हा अधिक सुदृढ आणि सक्षम असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी खचून न जाता अधिक बळकटीने समोर जावे. ग्रामीण भागातीलच युवक हा विविध क्षेत्रांत मोठमोठ्या पदावर कार्यरत असून, आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे युवकांनी ग्रामीण भागातील आहोत, याचा न्यूनगंड न बाळगता, अधिक मेहनत करून आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी केले. नांदा येथे वसंत तुमराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुद्रा स्पोर्टीग क्लबतर्फे आयोजित व्हॉलिबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आजचा काळ हा स्पर्धेचा असल्याने प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्याकडे कूच केली पाहिजे. मग ती स्पर्धा परीक्षा असो की, कोणतेही क्षेत्र त्यात जिद्दीने प्रयत्न केले पाहिजे. पोलीस भरती समोर आहे. त्यामुळे परिसरातील युवकांनी तयारी करावी. कोणतीही मदत लागल्यास सर्वोतोपरी तयार आहे, अशी ग्वाहीही उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी दिली. नांदा येथील सुरू असलेल्या दोन्ही वाचनालयांना स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्याचे आश्वासनही दिले.
यावेळी पेटकर विकास अधिकारी अल्ट्राटेक, उपसरपंच पुरुषोत्तम अस्वले, पुरुषोत्तम निब्रड, हर्षल धाबेकर उपस्थित होते.
सदर रुद्रा स्पोर्टिंग क्लब आयोजित दोन दिवसीय व्हॉलिबॉल सामने पार पडले. यात प्रथम पारितोषिक धोपटाळा, दुसरे पारितोषिक गडचांदूर, तृतीय पारितोषिक बामनवाळा यांनी पटकाविले.