शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणाची दारे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:46+5:302021-08-12T04:31:46+5:30
खास विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या घरमालकांच्या खोल्याही रिकाम्या ब्रह्मपुरी : पंचक्रोशीत ब्रह्मपुरी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोना महामारीचा मोठा ...
खास विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या घरमालकांच्या खोल्याही रिकाम्या
ब्रह्मपुरी : पंचक्रोशीत ब्रह्मपुरी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोना महामारीचा मोठा आघात शिक्षणावर झाला आहे. गेली दीड वर्षापासून शिक्षणाची दारे बंद आहेत. त्यामुळे शिक्षणनगरीही सध्या शिक्षणाची दारे उघडण्याच्या दिवसाची वाट बघत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत, पण शहरातील शाळा, कॉलेजेस मात्र बंद आहेत. शिक्षणाची गंगा ब्रह्मपुरीतून उगम पाहून ग्रामीण भागात वाहत जाण्याचा अखंड प्रवाह आता मात्र उलट्या दिशेने वाहताना दिसून येत आहे. शहरात आठ जि.प.शाळा, एक खासगी जि.प.शाळा, सहा खासगी हायस्कूल, एक जि.प हायस्कूल, दोन सीबीएससी हायस्कूल, पाच इंग्लिश मीडियम हायस्कूल, सात ज्युनिअर कॉलेज, चार पदवी महाविद्यालय, दोन पदव्युत्तर महाविद्यालय, दोन आयटीआय, पूर्वीची दोन डीएड व बीएड कॉलेज, एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय इतकी ज्ञानाची गंगा अविरत ओसंडून वाहत आहे. ती ज्ञानरूपी गंगा कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून हिरावून घेतली आहे. या ज्ञान गंगेत नागभीड, वडसा, आरमोरी, लाखांदूर, पवनी, सिंदेवाही, चिमूर आदी भागांतून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत होती. दीड वर्षापासून त्यांचेही येणे बंद आहे. ब्रह्मपुरीच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी शासकीय अथवा खासगी होस्टेल येथे वास्तव्य करायचे किंवा रूम किरायाने करून ज्ञान घ्यायचे. ते सर्व भूतकाळात समाविष्ट झाले आहे. अनेक घरे आजही विद्यार्थ्यांविना खाली आहेत. त्यामुळेच एकूणच ब्रह्मपुरीतील शिक्षणाची दारे बंद असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
ऑनलाइन शिक्षण अपुरेच
या काळात ऑनलाइन शिक्षण दिल्या जात आहे, पण माहिती व ज्ञानार्जनाच्या दृष्टीने ते अपुरे वाटत असल्याने विद्यार्थी निराश झाले आहेत. अनावश्यक मोबाइलचा खर्च पालकांवर पडलेला आहे. विद्यार्थी त्यातून अभ्यास कमी व सोशल मीडियाचा वापर जास्त करीत असल्याने शाळेची दारे उघडण्याची पालक वर्ग वाट पाहत आहे.
कोट
महाविद्यालय, शाळा सुरू करण्याची वाट पाहत आहोत. ऑनलाइनसाठी ग्रामीण भागात संसाधने तोकडी आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मार्गदर्शनापासून वंचित आहेत. शासनाने कोरोना संसर्ग कमी असलेल्या भागात मार्गदर्शन तत्त्वाचे पालन करून, शाळा चालू करण्यास काही हरकत नाही.
- प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे,
नेवाजाबाई हितकारिणी महाविद्यालयात, ब्रह्मपुरी.