डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:49 AM2019-10-10T10:49:12+5:302019-10-10T10:49:47+5:30
बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी विसापूर येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान मानवी मूल्यावर आधारीत आहे. त्यांच्या विचाराने शोषित व पीडित जनता जागृत होत आहे. त्यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रभाव समाजावर पडला आहे. मात्र समाजातील विभक्तपणामुळे त्यांच्या कार्याची गती मंदावल्याचे दिसून येते. बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी विसापूर येथे केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बौद्ध महासभा कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी प्रबोधन कार्यक्रमात तथागत बुद्धाला अपेक्षित समतामूलक समाज व्यवस्थेवर विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. एल. शेंडे होते. उद्घाटक अरुण जगताप तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच रिता जिलटे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष अविनाश वाघमारे, डॉ. सुनील बुटले, मोहन देठे, गौतम वनकर, भीमराव पाझारे, सुरेश पुणेकर, मिलिंद डोंगरे, रमेश दुबे, विजय वैद्य, प्रदीप पाझारे यांची उपस्थिती होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मदन बुरचुंडे यांनी संविधानाची अस्मितेची जागृती व्हावी म्हणून भारतीय संविधानाचे पुस्तक दान करण्याची घोषणा केली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
संचालन प्रज्ञा वनकर तर आभार सुरेश पुणेकर यांनी मानले. यावेळी तरुण बौद्ध मंडळ, सिद्धार्थ वाचनालय, पंचशील बौद्ध विहार, त्रिरत्न मंडळ व अशोका बौद्ध विहारातील पदाधिकारी व समाज बांधवांची उपस्थिती होती.