डॉ. बाबासाहेबांची स्वाक्षरी, फोटोच्या शर्ट खरेदीसाठी तरुणाईची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 02:23 PM2023-04-13T14:23:16+5:302023-04-13T14:26:21+5:30
ऑनलाइनवर जोमात खरेदी : तरुणाईमध्ये भीम जयंतीचा जल्लोष
चंद्रपूर : दोन दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येऊन ठेपली आहे. बाल-थोरांपासून ज्येष्ठांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, स्वाक्षरी असलेला शर्ट, टी-शर्ट खरेदी करण्यासाठी तरुणाई मोठी धडपड करत आहे. कुणी ऑनलाइनवर तर कुणी दुकानात जाऊन डॉ. बाबासाहेबांची स्वाक्षरी फोटो असलेला शर्ट, टी-शर्ट, कुर्ती खरेदी करत आहेत.
संपूर्ण जगात मोठ्या धूमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी करण्यात येत असते. १४ एप्रिलला अनेकजण पांढरे वा निळे कपडे घालण्याला पसंती देतात. तर कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी, फोटो असलेल्या शर्ट, टी-शर्ट, कुर्ती, साडी, घालण्याला पसंती देत असतात. त्यामुळे यंदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी, फोटो असलेल्या शर्ट, टी-शर्ट, कुर्ती, साडी, सलवार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. तर अनेकजण ऑनलाइन खरेदी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी तयारी करत आहेत.
महिलांसाठी धम्मचक्र साडी
१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी महिला या पांढऱ्या साड्या परिधान करत असतात. त्यामुळे पांढऱ्या साडीला निळी बॉर्डर असणारी, तसेच साडीवर धम्मचक्र असणारी साडी, पिंपळाचे पान असणारी साडी बाजारपेठेत वा ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. धम्मच्रक साडीसाठी महिलांची मोठी मागणी असल्याचे दिसून येते.
दरवर्षी १४ एप्रिलला पांढऱ्या कपड्याची मागणी असते. यंदाही पांढऱ्या कपड्याची मागणी अधिक आहे. त्यासोबतच शर्ट वा टी-शर्टवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, स्वाक्षरी असलेला शर्ट, टी-शर्ट यासोबत पांढऱ्या रंगाला निळी बॉर्डर असलेल्या कुर्तीला अधिक मागणी दिसून येत आहे.
- अमोल गेडाम, बी बाॅईज कलेक्शन
रिल्स व व्हिडीओद्वारे ऑनलाइन मार्केटिंग
पांढऱ्या कपड्यांवर वेगवेगळे लोगो, फोटो, मूर्ती काढून देणारे तसेच नावे, वेगवेगळ्या कोट लिहून देणारे व्यवसाय आता सुरू झाले आहेत. १४ एप्रिल जवळ आल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी, फोटो असलेल्या कपड्याची मार्केटिंग करताना दिसून येत आहेत.
निळ्या पताकांनी सजली शहरे
१४ एप्रिल जवळ येताच गावगावांत, शहराशहरात अनेक मंडळे, सामाजिक संस्था भीम जयंतीच्या तयारीला लागले आहेत. निळ्या पताका, पंचशील ध्वज लावून गाव-शहरातील चौक सजविण्यात आले आहेत. काही ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.