डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झाले अर्धशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:09 AM2019-05-20T00:09:46+5:302019-05-20T00:11:20+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर स्वागताध्यक्ष म्हणून पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व मान्यवर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर स्वागताध्यक्ष म्हणून पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व मान्यवर उपस्थित होते.
मे महिण्याच्या मध्यानंतरचे नवतपाचे पर्व चंद्रपुरातील पुरोगामी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना अजुनही ज्ञात आहे. इंदिरा गांधी यांचे दुपारी रणरणत्या उन्हात आगमन झाले होते. कस्तुरबा मार्गे गांधी चौकातून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्या. कारमधून उतरण्याची त्यांची चपळाई आणि क्षणात पुतळ्याजवळ पोहोचून अनावरण करणे हा क्षण डोळ्यात साठविणारे शेकडो नागरिक शहरात आहेत. पुतळा अनावरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीक्षा मैदानावर जाहीर सभा झाली. देशातील बौद्ध व पददलितांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्या सोडविल्याच पाहिजे, असा निर्धार त्यांनी भाषणातून व्यक्त केला. त्यांचे ३० मिनीटांचे भाषण लक्षवेधी ठरले. कार्यक्रमानंतर त्या हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना झाल्या.
३५ हजारांत तयार झाला स्फूर्तीदायी पुतळा
बॅरि. राजाभाऊंच्या देखरेखेखाली पेडेस्टल उभारण्यात येवून त्यावर पुतळा चढविण्यात आला. हा पेडेस्टल गिरीशबाबू खोब्रागडे यांनी तयार केला. ते सिव्हील इंजिनिअर होते. या पुतळ्याची किंमत ३५ हजार होती. अत्यंत माफक दरात शिल्पकार वाघ यांनी चंद्रपूरकरांना हा पुतळा तयार करून दिला. येथे जनता महाविद्यालयाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. शहरात तेव्हा हेच एकमेव कॉलेज होते. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे मोठ्या संख्येने शिक्षण घेत होते. त्यांनी पुतळ्यासाठी आर्थिक मदत केली. या स्फुर्तीदायी पुतळ्याला आज ५० वर्षे पूर्ण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जागतिक कीर्तीचे मुंबई येथील शिल्पकार वाघ यांनी तयार केला. ते इंदिरा गांधी यांचे चाहते आणि बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे मित्र होते. सतत तीन दिवस त्यांचा चंद्रपूरात मुक्काम होता. दिल्ली येथे उभारलेल्या बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्यासारखाच चंद्रपुरातील हा ब्रॉंझचा पुतळा तयार केल्याची आठवण ते अभिमानाने सभा संमेलनातून सांगायचे. हा इतिहास नवीन पिढीला कळला पाहिजे.
-अॅड. व्ही. डी. मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते