डॉ. खुटेमाटेंनी दिली मेहुण्याच्या हत्येची सुपारी
By admin | Published: April 13, 2017 12:45 AM2017-04-13T00:45:51+5:302017-04-13T00:45:51+5:30
शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ्ज डॉक्टरने आपसी वादातून आपल्या मेहुण्याच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे.
चंद्रपुरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ्ज : पोलिसांनी आणले प्रकरण उघडकीस
चंद्रपूर : शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ्ज डॉक्टरने आपसी वादातून आपल्या मेहुण्याच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. प्रसिद्ध नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. चेतन खुटमाटे असे सुपारी देणाऱ्या डॉक्टरचे नाव असून या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.
चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रचिकित्सक डॉ. चेतन खुटमाटे यांचा विवाह घुुग्घुस येथील डॉ. चेतन मुसळे यांच्या बहिणीसोबत झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉ.खुटमाटे यांचे पत्नीसोबत पटत नव्हते. या प्रकरणात डॉ. मुसळे यांनी हस्तक्षेप केल्याने वाद वाढतच गेला. त्यामुळे डॉ. खुटेमाटे यांनी मेहुणा डॉ. मुसळे यांच्या हत्येची सुपारी गजानन पाल नामक या व्यक्तीला दिली. आपल्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती डॉ. मुसळे यांना लागताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून प्रकरण उघडकीस आणले. पोलिसांनी डॉ. खुटमाटे यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून डॉ.चेतन खुटमाटे व हत्येची सुपारी घेणारा गजान पाल याला ताब्यात घेतले. त्यांची जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र दोघांचीही प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.
प्रकृतीत सुधारणा होताच दोघांनाही ताब्यात घेतले जाईल, असे एसडीपीओ नायक यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)