पोलिसांकडून डाॅ. शीतल आमटेंच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:47+5:302020-12-06T04:30:47+5:30
चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ...
चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शोधण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. ही बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न होईपर्यंत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मृत्यूमागील नेमक्या कारणांचाही शोध घेणे सुरू केले आहे.
डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. यासाठी पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहावी लागत आहे. हा अहवाल केव्हा प्राप्त होईल, याबाबत पोलीसही अनभिज्ञ आहेत. तो अहवाल जलदगतीने प्राप्त व्हावा म्हणून स्वत: पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी प्रयोगशाळा प्रमुखांना पत्र दिले आहे.
डाॅ. शीतल यांचा मृत्यू नैसर्गिक नाही, ही बाब स्पष्ट आहे. मग डाॅ. शीतल यांच्या मृत्यूमागे घातपात आहे वा त्यांनी आत्महत्या केली. या मागील कारणांचा छडाही पोलिसांना लावायचा आहे. पोलिसांनी या दिशेने तपास वळविला असल्याचे समजते. डाॅ. शीतल आमटे या मानसिक तणावात होत्या, ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. या मानसिक तणावाचे काय कारण होते, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आनंदनातील काही जणांचे जबाब नोंदविले आहेत. मृत्यूला कौटुंबिक कलह कारणीभूत आहे का, या दिशेनेही शोध सुरू आहे. यासाठी आमटे कुटुंबीयांचे जबाबही पोलीस नोंदविणार आहेत. तत्पूर्वी डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होण्याची पोलिसांना वाट आहे.
गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस
पाेलीस सूत्रानुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे थेट कौटुंबिक कलहाचे कारण जोडता येत नाही. डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या आठ-दहा दिवसांपूर्वीपर्यंत आमटे कुटुंबीय डाॅ. शीतल यांच्या संपर्कात नव्हते. तेव्हा आमटे कुटुंबीयांना या घटनेशी थेट जोडता येत नाही. यामुळे आधी मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल. त्यानंतर दरम्यानच्या काळातील घडलेला घटनाक्रम शोधला जाईल. गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस केली जाईल.
करजगी कुटुंबीयांच्या बयाणांबाबत गोपनीयता
घटनेच्या दिवशी पती गौतम करजगी हे घरी आले तेव्हा त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दाराची कडी आतून लावलेली होती. गौतम करजगी यांनी अखेर दार उघडले. तेव्हा डाॅ. शीतल खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना आनंदवनमधील रुग्णवाहिकेतून थेट उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनाक्रमाबाबत पोलिसांनी करजगी कुटुंबीयांचे जबाब नोंदविलेले आहेत. यामध्ये काय पुढे आले, ही बाब पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे.