ऑस्ट्रेलियात रोवला झेंडा; डॉ. प्राजक्ता अस्वार विदर्भातील पहिल्या महिला फुल ‘आयरन मॅन’
By परिमल डोहणे | Published: December 9, 2023 02:22 PM2023-12-09T14:22:57+5:302023-12-09T14:23:35+5:30
ऑस्टेलियामध्ये रोवला चंद्रपूरचा झेंडा
परिमल डोहणे
चंद्रपूर : ऑस्ट्रेलिया येथील बसल्टन येथे नुकत्याच झालेल्या फुल आयरन मॅन स्पर्धेत चंद्रपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता अस्वार यांनी सहभाग घेऊन भरारी मारली आहे. जलतरण, सायकलिंग, रनिंग अशा तीनही स्पर्धेचे १७ तासांच्या आता गाठायचे अंतर जगातील तब्बल हजार स्पर्धकांना मागे टाकत केवळ १३ तास ४५ मिनिटात गाठून विदर्भातील पहिल्या ‘आयरन मॅन’ ठरण्याचा बहुमान पटकावत ऑस्टेलियामध्ये चंद्रपूरचे नाव कोरले आहे. डॉ. प्राजक्ता अस्वार या चंद्रपुरात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयरन मॅन ही स्पर्धा घेण्यात आली. यात देशभरातील एक हजार स्पर्धक व भारतातील २५ स्पर्धक सहभागी झाले होते. फुल आयरन मॅन या स्पर्धेत जलतरण ३.८ किमी, सायकलिंग १८० किमी, रनिंग ४२ किमी असे तीन भाग केले होते. या तीनही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एकूण १७ तासांचा कालावधी दिला होतो. डॉ. प्राजक्ता अस्वार यांनी ही स्पर्धा केवळ १३ तास ४५ मिनिटात पूर्ण करून ‘आयरन मॅन’ या पुरस्कारला गवसणी घातली. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या त्या विदर्भातील पहिल्या महिला खेळाडू आहेत. या स्पर्धेसाठी लागणारा संपूर्ण सराव डॉ. प्राजक्ता यांनी चंद्रपूर येथेच पूर्ण केला. चंद्रपूर सारख्या शहरात या खेळांसाठी अतिशय तुटपुंज्या सोयी असतानाही त्यांनी मिळविलेले यश हे व्याखाणण्याजोगे आहे. यापूर्वी त्यांनी हाफ आयरन मॅन, आयरन मॅन ७०.३ गोवा व जर्मनी येथे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. तसेच फिनफॅड येथे झालेल्या आयरन मॅन ७०.३ वर्ल्ड चॅम्पियनशिपसुद्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल फेब्रुवारी २०२४ मध्ये नागपूर येथे होणाऱ्या टायगर मॅन ट्रायथलॉन या स्पर्धेच्या त्या ब्रँड अँबेसेडर म्हणून त्यांची निवड केली आहे.