डॉ. शीतलच्या आठवणी जागवत शर्वीलने वाढदिवशी केले वृक्षारोपण; आनंदवन झाले भावुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 02:13 AM2020-12-05T02:13:07+5:302020-12-05T02:13:17+5:30
वृक्ष लागवड केल्यानंतर शर्वील आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे तरंगत होती.
वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्युला शुक्रवारी पाच दिवस झाले. डाॅ. शीतलचा सहा वर्षीय मुलगा शर्वीलचा आज वाढदिवसही होता. दरवर्षी आई डाॅ. शीतल वृक्षारोपण करून आपल्या शर्वीलचा वाढदिवस साजरा करायची. आज शर्वीलने आईच्या आठवणीत रोप लावून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी आनंदवनातील वातावरण भावूक आणि नि:शब्द होते.
वृक्ष लागवड केल्यानंतर शर्वील आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे तरंगत होती. हातात जास्वंदाचे फूल घेऊन बोबड्या शब्दांत ‘मम्माऽऽ’ अशी हाक मारत त्याने आपल्या आईच्या समाधीवर ते फूल अर्पण केले. या भावूक क्षणाचे साक्षीदार त्याचे वडील गौतम करजगी, आजोबा डाॅ. विकास आमटे, आजी भारती आमटे, सुहासिनी करजगी व शिरीष करजगी यांच्यासह आनंदवनातील परिवार होता. शर्वील आईविना पोरका झालेला आहे. तो सतत आईची आठवण काढत असतो. त्याचे मन कुठल्याही गोष्टीत रमत नसल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले.
आनंदवन पूर्वपदावर येत असले तरी कोणच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. सारे काही संपल्यागत आनंदवनातील मंडळी आपापली कामे करताना दिसून आली. आनंदवनात नीरव शांतता बघायला मिळाली.