विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग; चंद्रपुरात १६ डिसेंबरला ६८ वे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 10:56 AM2022-11-23T10:56:32+5:302022-11-23T14:58:23+5:30
तीन दिवस साहित्य रसिकांसाठी मेजवानी
चंद्रपूर : विदर्भसाहित्य संघ नागपूरच्या शताब्दी वर्षानिमित्त सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच आणि सर्वोदय शिक्षण मंडळाच्या १६, १७ आणि १८ डिसेंबर २०२२ रोजी स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन होणार आहे. संमेलाध्यक्षपदी प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. वि. स. जोग यांची निवड झाली, अशी माहिती मुख्य संयोजक माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संमेलनाचे संरक्षक प्रशांत पोटदुखे, संमेलन कार्यवाह डॉ. प्रमोद काटकर, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, वि. सा. संघाचे प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, सचिव प्रदीप देशमुख उपस्थित होते. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन् होईल. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. म. रा. जोशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. फिरदौस मिर्जा उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष अद्याप ठरायचा आहे. या संमेलनात कथाकथन तसेच साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावला आहे का? आणि झाडीबोली व झाडीपट्टीतील नाटकाचा सहसंबंध यावर चर्चासत्र, तर रात्री ८ वाजता डॉ. मिर्जा रफी बेग यांच्या अध्यक्षतेत काव्यसंमेलन होईल. १७ डिसेंबरला कविसंमेलन व दुपारी ११ वाजता देवाजी तोफा आणि डॉ. सतीश गोगुलवार यांचे अनुभव कथन होईल. दुपारी ३ वाजता गजल मुशायरा, सायंकाळी ५ वाजता वैदर्भीय साहित्याच्या अभिवृद्धीत समाजमाध्यमांची भूमिका यावर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र होणार आहे.
यंदा साहित्य संमेलनात अभिरूप न्यायालय
रविवार १८ डिसेंबरला सकाळी १० वाजता चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांतील ‘वन्यजीव पाणी आणि पर्यावरण’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावडे यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र होणार आहे. दुपारी १२ वाजता वि. सा. संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम होईल. दुपारी २ वाजता होणाऱ्या अभिरूप न्यायालयात आरोपी म्हणून कादंबरीकार शुभांगी भडभडे सहभागी होतील, तर आरोपीचे वकील प्रकाश एदलाबादकर आणि सरकारी वकील म्हणून डॉ. रवींद्र शोभणे काम पाहतील. न्यायाधीशाची भूमिका मोहन पांडे पार पाडतील.