कारच्या बोनेटमध्ये शिरला अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:00 AM2020-11-29T05:00:00+5:302020-11-29T05:00:24+5:30
अनुप माथनकर व अविनाश रोडे हे वडगाव येथील रहिवासी असून गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ऊर्जानगरकडून होंडा सिटी या गाडीने शेतावरून परत येत असताना समोर एक भला मोठा अजगर साप त्यांच्या गाडी समोर आला. त्यांनी लगेच गाडी थांबवली. नंतर खाली उतरून बघितले असता त्यांना साप दिसला नाही. म्हणून गाडीचे बोनेट उघडून पाहिले असता तो अजगर त्यांना तिथे आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उर्जानगरकडून वडगावकडे येत असलेल्या होंडा सिटी कारच्या बोनेटमध्ये चक्क अजगराने ठाण मांडले होते. हा प्रकार गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. हे बघून कारचालकाने तत्काळ सर्पमित्राला बोलावले. मात्र अजगर मोठा असून इंजिनमध्ये फसला होता. त्यामुळे अखेर वाहन गॅरेजमध्ये नेऊन अजगराला बाहेर काढावे लागले.
अनुप माथनकर व अविनाश रोडे हे वडगाव येथील रहिवासी असून गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ऊर्जानगरकडून होंडा सिटी या गाडीने शेतावरून परत येत असताना समोर एक भला मोठा अजगर साप त्यांच्या गाडी समोर आला. त्यांनी लगेच गाडी थांबवली. नंतर खाली उतरून बघितले असता त्यांना साप दिसला नाही. म्हणून गाडीचे बोनेट उघडून पाहिले असता तो अजगर त्यांना तिथे आढळला. घाबरून लगेच बोनेट बंद करून सर्प मित्र साईनाथ चौधरी व अमित देशमुख यांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली, अमित देशमुख, सुरज डहाके हे घटनास्थळी पोहोचून बोनेटमधून काढण्याचा प्रयत्न करते होते. पण अजगर हा मोठा असल्याने तो गाडीच्या इंजिनमध्ये फसला होता. खूप प्रयत्न करूनसुद्धा अजगर साप निघत नव्हता. शेवटी हतबल होऊन रात्री १:३० वाजताच्या सुमारास एका गाडीच्या साहाय्याने ऊर्जानगर येथील गॅरेजमध्ये गाडी नेण्यात आली. देशमुख या सुरज डहाके यांनी पुन्हा प्रयत्न सुरु करून त्या अजगराला शुकवारी पहाटे ५ वाजता गाडीच्या बोनेटमधून बाहेर काढण्यात यश आले. सदर अजगर तब्बल ९ फुटाचा होता. सकाळी वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक तावडे व फॉरेस्ट गार्ड दहेगावकर यांच्या उपस्थितीत अजगराला निसर्गमुक्त करण्यात आले.
शेतातही अजगर
मागील काही महिन्यात जिल्ह्यात अचानक अजगरांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वीही अनेक भागात अजगर आढळून आला आहे. एवढेच नव्हे तर अनेक शेतकरऱ्यांच्या शेतातही अजगराचे वास्तव्य दिसून आले आहे. हे अजगर ताडोबा जंगलातून येत असावे, असा अंदाज आहे.