ओपनकास्टसाठी नाला वळविल्याने धान पीक पाण्याखाली !
By admin | Published: July 17, 2016 12:37 AM2016-07-17T00:37:52+5:302016-07-17T00:37:52+5:30
जिल्ह्यातील वरोरा परिसरात असणाऱ्या नागलोन ओपनकॉस्टचे बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते.
शेतकऱ्यांचे नुकसान : मदत द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा परिसरात असणाऱ्या नागलोन ओपनकॉस्टचे बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार, खासदारांना निवेदन दिले. मात्र कोणत्याही प्रतिनीधीने त्यांची समस्या सोडविली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी मधुकर डाहुले या शेतकऱ्याने केली आहे.
नागलोन ओपनकॉस्ट परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्याच्या पूर्वेला शिरणा नदी आहे. पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाणारा कोराडी नाला आहे. मात्र सप्टेंबरपासून नागलोन ओपनकॉस्ट केल्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाने कोराडी नाल्याची दिशा बदलवून तो पश्चिमेकडून पूर्वेला शिरणा नदीकडे वळविला आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर दोन्ही नाल्याचे बॅक वॉटर परिसरातील शेतात जाते. संततधार पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली आली. त्यामध्ये पळसगाव परिसरातील २० शेतकऱ्यांची पिके संपूर्णत: पाण्याखाली येऊन सडली. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वेक्षण करुन मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
सर्वेक्षण
करण्याची मागणी
मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याभरात सतत पाच दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे नागलोन नाल्याच्या बॅक वॉटरचे पाणी परिसरातील शेतात गेले. शेतकऱ्यांनी ओरड करूनही अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे सर्वेक्षण करुन मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी मागितली
आत्महत्येची परवानगी
परिसरातील शेतकऱ्यांनी आपली समस्या सोडविण्यासाठी आमदार, खासदार, त्याचबरोबर जिल्हाधिकारी, तहसीलदार, वेकोलि व्यवस्थापक यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आहे. मात्र कुणीही दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मदत द्या, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी केली.