मलनिस्सारण योजनेचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:26 PM2018-09-24T23:26:33+5:302018-09-24T23:26:59+5:30

चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना काही वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासून या योजनेत नियोजनाची ऐसीतैशी करण्यात आल्याने ही योजना अनेक वर्ष लोटूनही पूर्णत्वास येऊ शकली नाही. ७० कोटींची ही योजना आता सुमारे सव्वाशे कोटींवर जाऊन पोहचली आहे.

Drainage | मलनिस्सारण योजनेचे भिजत घोंगडे

मलनिस्सारण योजनेचे भिजत घोंगडे

googlenewsNext
ठळक मुद्देकामे पुन्हा ठप्प : ७० कोटींची योजना सव्वाशे कोटींवर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना काही वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासून या योजनेत नियोजनाची ऐसीतैशी करण्यात आल्याने ही योजना अनेक वर्ष लोटूनही पूर्णत्वास येऊ शकली नाही. ७० कोटींची ही योजना आता सुमारे सव्वाशे कोटींवर जाऊन पोहचली आहे. मात्र ही योजना कधी सुरू होईल का, याची खात्री खुद्द मनपाचे नगरसेवकही देऊ शकत नाही. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे, तोदेखील व्यर्थ जातो की काय, असे वाटायला लागले आहे.
चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर अनेक नवीन योजना प्रस्तावित आहेत. मात्र आजवर एकही योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही. २००७ मध्येच या योजनेबाबत नगरपालिका स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. २००९-१० मध्ये भूमिगत मलनिस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यानंतर योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आले. मात्र २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३, १४, १५, १६, १७ हेदेखील वर्ष गेलीत. आता २०१८ उजळले आहे. मात्र भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम पूर्णत्वास आलेले नाही. या योजनेत जे काम करण्यात आले. त्याचाही खेळखंडोबाच झालेला आहे. रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आला. मात्र नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येतो. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लॅन्ट पठाणपुरा परिसरात आहे. मात्र त्याचेही काही काम शिल्लक आहे. अनेक वॉर्डात पाईप लाईनचे काम शिल्लक आहे.
रस्ते पुन्हा धोक्यात
यापूर्वी तीन वर्ष भूमिगत मलनिस्सारण योजनेमुळेच चंद्रपूरकरांना दयनीय रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागले. आता रस्ते तयार होतील. मात्र मलनिस्सारण योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अनेक वॉर्डातील रस्ते या योजनेमुळे पुन्हा फुटण्याची शक्यता आहे.
योजनेची वाढली किंमत
भूमिगत मलनिस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. आता पुन्हा योजनेची किंमत वाढून ती सव्वाशे कोटींच्याही पार गेली आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर आणखी अंदाजपत्रकीय किंमत वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.