अपूर्ण नाली बांधकामामुळे गटारातील पाणी विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:55+5:302021-07-10T04:19:55+5:30
सिंदेवाही : नगरपंचायतीच्या सदोष नाली बांधकामाचा फटका प्रभागातील अनेक लोकांना बसत आहे. अनेक तक्रारी नगरपंचायतकडे दाखल होत आहेत. ...
सिंदेवाही : नगरपंचायतीच्या सदोष नाली बांधकामाचा फटका प्रभागातील अनेक लोकांना बसत आहे. अनेक तक्रारी नगरपंचायतकडे दाखल होत आहेत. सिद्धार्थ चौकात अपूर्ण नाली बांधकामामुळे गटारातील पाणी विहिरीमध्ये शिरले असून, विहिरीतील पाणी पूर्णपणे प्रदूषित झालेले आहे.
याशिवाय परिसरात गटारांमध्ये पाणी साचलेला आहे. सिद्धार्थ चौकात नाली बांधकामाला सुरुवात करण्यात आली. काही जागृत लोकांच्या तक्रारीमुळे नाली बांधकाम थांबविण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात खोदलेले नाली बांधकाम अजूनपर्यंत पूर्ण केलेले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नालीमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. नालीमध्ये साचलेले पाणी जवळ असलेल्या विहिरीमध्ये उतरत असल्यामुळे सिद्धार्थ चौकातील सुदामराव खोबरागडे यांच्या घराच्या विहिरीतील पाणी पूर्णपणे प्रदूषित झालेले आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत सिंदेवाही यांच्याकडे अनेकदा विनंती करूनही विनंतीला केराची टोपली दाखविण्यात आली. नगरपंचायतीच्या लालफितीचा फटका सिंदेवाहीनगरातील नागरिकांना बसत आहे. अपूर्ण नाली बांधकाम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
090721\img-20210709-wa0046.jpg
अपूर्ण नाली बांधकामामुळे गटारातील पाणी विहिरीत