-अन् नियतीने हिरावले त्याचे देशसेवेचे स्वप्न
By admin | Published: July 16, 2016 01:12 AM2016-07-16T01:12:47+5:302016-07-16T01:12:47+5:30
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने व बालपणीच वडिलांचे छत्र हरविल्याने आपण शिकून देशसेवा करणार,...
चिमूरकर हळहळले : चिमूरच्या एनसीसी कॅडेडवर काळाची झडप
राजकुमार चुनारकर चिमूर
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने व बालपणीच वडिलांचे छत्र हरविल्याने आपण शिकून देशसेवा करणार, असे स्वप्न उराशी बाळगून भूषण किशोर मेहरकुरे (२०) याने मागील वर्षी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याने बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण सुरू असताना एन.सी.सी.च्या द्वितीय सत्रात भाग घेतला. त्याचा वर्धा येथे एन. सी. सी.चे प्रशिक्षण करीत असताना विद्युत शॉक लागून दुदैवी मृत्यू ओढवल्याने त्याने उराशी बाळगलेले स्वप्न नियतीने हिरावले. त्याने एका जवानाचा जीव वाचविता आपले प्राण गमावले.
आबादी वॉर्डातील किशोर व सुनिता मेहरकुरे यांच्या संसारवेलीवर भूषण व चेतन या दोन भावंडांनी जन्म घेतला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने वडील व आई मिळेल ते काम करून संसाराचा गाढा चालवित होते. मात्र उमेदीतच भूषणचे वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे घरची जबाबदारी आई सुनिता व कर्ता मुलगा म्हणून भूषणवर आली होती. भूषण शिक्षणासह छोटे-मोठे काम करून कुटुंबाचा गाढा चालविण्यास आईला मदत करीत असायचा. मात्र भूषणच्या अचानक जाण्याने त्याच्या आईवर मोठा आघात झाला आहे.
आई व भावासाठी शिकून काही करण्याच्या आशेने भूषण राष्ट्रसंत महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता.
सोबतच देशसेवा करायची लहानपणापासून आवड असल्याने त्याने एन.सी.सी.त प्रवेश घेतला. एन.सी.सी.च्या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयामार्फत १२ जूनला शेलुकाटी (वर्धा) येते १२ प्रशिक्षर्णासह गेला होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता शिबिरातील एक हवालदार लाईटचा प्लग लावत असताना विद्युत शॉक लागला. या हवालदाराला वाचवण्यासाठी भूषण कशाचीही पर्वा न करता धाव गेला. त्याने हवालदाराला ओढून वाचविले मात्र लोखंडी शिडीत विद्युत प्रवाह असल्याने स्वत: भूषण ओढल्या गेला. त्यामध्ये भूषणचा दुर्दैवी मृत्यू झाला.
भूषणच्या मृत्यूचे वृत्त चिमूर शहरात रात्रीच धडकले. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह आबादी वॉर्ड व महाविद्यालयावर शोककळा पसरली. शुक्रवारी भूषणचा मृतदेह चिमूरला दुपारी आणल्यावर येथील स्मशान घाटावर त्याच्या मृतदेहाला भडाग्नी देण्यात आला.
शहरात पसरली शोककळा
भूषण महाविद्यालयामध्ये त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे शिक्षकासह सर्वांच्या मनात बसला होता. त्याचा अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्युमुळे तो राहात असलेल्या परिसरात व महाविद्यालयासह शहरावर शोककळा पसरली. अगोदर सौभाग्याचा धनी व नंतर कर्ता मुलाच्जा दुर्दैवी मृत्यूने त्याच्या आईवर मोठा आघात झाला आहे.
साश्रू नयनांनी दिली अखेरची मानवंदना
मनमिळावू स्वभावाचा व हरहुन्नरी भूषणच्या अपघाती मृत्यूमुळे चिमूरकरांनी त्याच्या राहत्या घरी मोठी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजता भूषणला साश्रू नयनांनी हजारो नागरिक, एन.सी.सी. कॅडेट, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी तथा वर्धाचे कर्नल एस.बी. देशपांडे, नायक, सुभेदार, हवालदार यांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात आली.