चंद्रपूरला स्मार्ट सिटी बनविणे हे स्वप्न
By admin | Published: April 17, 2017 12:36 AM2017-04-17T00:36:16+5:302017-04-17T00:36:16+5:30
वाढत्या शहरीकरणाच्या काळात गावे ओस पडली आणि शहरे बकाल झाली. या शहरांच्या स्वास्थ्यासाठी योजना आखण्यात आल्या नाही.
मुख्यमंत्र्यांची सभा : वायफाय सिटी बनविण्याचे आश्वासन
चंद्रपूर : वाढत्या शहरीकरणाच्या काळात गावे ओस पडली आणि शहरे बकाल झाली. या शहरांच्या स्वास्थ्यासाठी योजना आखण्यात आल्या नाही. चंद्रपूर या महानगराचे रूप पालटवून या शहराला स्मार्ट सिटी बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कले.
चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्थानिक क्लब ग्राऊंडवर झालेल्या सभेत ते बोलत होते. सभेला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यावर प्रथमच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना आखण्यात आली. खाजगी क्षेत्रातील उत्पादकतेला सामूहिक क्षेत्राचे रूप देवून देशाचे उत्पन्न वाढविण्यचा प्रयत्न झाला. मोदी सरकारने देशातील शहरांचा बकालपणा घालविण्यासाठी योजना आखल्या आहेत. २८ शहरात एकाच वेळी अटल अमृत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. शहर रोगमुक्त करण्यासाठी सांडपाण्यावार प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प नागपुरात उभारला. घनकचरा ही संपत्ती मानून या कचऱ्याचे रूपांतर खतात केले गेले. या खताचा ब्रँड तयार करण्यात आला. ग्रीन कोल ही संकल्पना अस्तित्वात आणून रोजगाराचा नवा मार्ग निर्माण केला. कचऱ्यातून वीज निर्मीतीचाही प्रकल्प केला. हे सर्व प्रकल्प चंद्रपुरात व्हावे हे आपले स्वप्न आहे.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पंतप्रधान यो योजनेतून सर्वांना घरे मिळावी यासाठी निवडणुका संपताच गरजुंसाठी घरांचे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशी सूचनाही त्यांनी स्थानिक नेत्यांना केली.
ना. सुधीर मुनगंटीवार यांचे या शहरात उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे स्वप्न आहे. त्या सोबतच या शहराला वाय-फाय सिटीचा दर्जा देण्याचे आश्वासनही मुख्यंमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिले. चंद्रपूरच्या विकासासाठी मुलभूत सुविधांवर खर्च करण्याचे नियोजन असून शहरातील लोकसंख्येला मानव विकासात परावर्तीत करण्याचे आपले स्वप्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, मागील अडीच वर्षात शहरात १६९ कोटी रूपयांची विकास कामे घडली. त्यासाठी ना. मुनगंटीवारांनी प्रचंड निधी आणला. या विकास कामातून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे ते म्हणाले.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून शहरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. शुद्ध पाणी, नद्यांची स्वच्छता, पर्यावरण, रस्ते, बाबा आमटे अभ्यासिका, बाबूपेठ उड्डाण पूल, महानगर पालिकांच्या इ-लर्निग शाळा यासह अनेक बाबींसाठी नियोजन करून योजना आकारास येत असल्याचे ते म्हणाले. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)