वरोरावासीयांचे स्वप्न साकार झाले
By admin | Published: January 11, 2015 10:49 PM2015-01-11T22:49:34+5:302015-01-11T22:49:34+5:30
वरोरा तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय गाठण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील चंद्रपूर येथे जावे लागत होते. वरोरा शहरात सात वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाली.
वरोरा : वरोरा तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय गाठण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील चंद्रपूर येथे जावे लागत होते. वरोरा शहरात सात वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाली. आज न्यायालय स्वत:च्या इमारतीत सुरू होणार असल्याने माझ्यासह वरोराकरांचे खरे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपुरकर यांनी केले.
ते वरोरा न्यायालयाच्या आवारात झालेल्या न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इमारतीचे उद्घाटन उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेला सोहळा चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मंचावर वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. अशोक बोथले, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर उपस्थित होते.
यावेळी न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तेलंग, उपविभागीय अभियंता गावंठे, कंत्राटदार राठी यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अशोक बोथले यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी मानले. कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मो.वि. टेमुर्डे, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी मंत्री संजय देवतळे, प.स. सभापती सुनंदा जिवतोडे, वरोरा न.प. अध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे, चंद्रपूर जिल्ह्यातील वकील मंडळी, अधिकारी, कर्मचारी तसेच वरोरा शहरातील नागरीक व न्यायमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)