ऐन दुष्काळी परिस्थितीत नाफेडची तूर खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:42 AM2019-04-14T00:42:15+5:302019-04-14T00:42:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासनातर्फे नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आले. ५ मार्चला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासनातर्फे नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आले. ५ मार्चला चालू झालेली आॅनलाईन नोंदणी २० तारखेलाच बंद झाल्याने यावर्षी चालू झालेली खरेदी व आॅनलाईन नोंदणी १५ दिवसातच बंद झाली. शासनाने ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात तूर देऊन ‘कोणी तूर घेता का तूर’ अशी बेंबीच्या देठापासून ओरडण्याची वेळ आणून ठेवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांची दिल्ली वारी अन् शेतकºयांच्या हाती तुरी अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. आतापर्यंत प्रचारात व्यस्थ असलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्षच दिले नाही. शेतकऱ्यांची हाक कुणीच ऐकली नाही. मात्र आता प्रचार संपला आणि निवडणूकही आटोपली. आतातरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी तूर हे मुख्य पीक असल्याने जिल्ह्यात यंदा तूर उत्पादनाचा टक्का वाढला आहे. शासनाची नाफेड खरेदी बंद झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना कमी भावात खासगी व्यापाºयांना माल विकावा लागत आहे.
शासनाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने नाफेड तूर खरेदी अंतर्गत तुरीला प्रति क्विंटल पाच हजार ६७५ रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांना दिलासा निर्माण झाला होता. परंतु शासकीत तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल बाराशे-पंधराशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
माझ्या शेतातले तूर पीक निघण्याआधीच शासनाने नाफेड तूर खरेदीसाठी सुरू केलेली आॅनलाईन नोंदणी बंद केली. यामुळे आता माझे मोठे नुकसान होणार असून १८ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहेत. शासनाने आॅनलाईन नोंदणी चालू करून नाफेड अंतर्गत तूर खरेदी करावी.
-दौलत गिरटकर
प्रगतशील शेतकरी, बोरी नवेगाव
शासनाच्या चुकीच्या नियोजनाचे फटके शेतकऱ्यांना बसत असून शासनाने हुकूमशाही धोरण, शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबवून नाफेड तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी केंद्र चालू करावे.
- मनोज भोजेकर
समाजसेवक, गडचांदूर