धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:15 PM2017-10-30T23:15:22+5:302017-10-30T23:15:44+5:30
यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे.
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. यावर मात करायची असेल तर शेतपिकांना सिंचनाची सोय करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात सिंचनाच्या सोईसाठी मोठी धरणे आहेत. परंतु पिके सुकायला लागली तरी धरणाचे पाणी अजूनही शेतीला सोडण्यात आले नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांना दिले जात असून या धरणांचा शेतीला काय फायदा, असा प्रश्न आता शेतकरी विचारु लागले आहे.
निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपले आहेत. पावसाअभावी शेती बेभरवशाची झाली आहे. पाण्याशिवाय शेती करणे ही संकल्पनाच तशी अवघड आहे.
शेतकºयांना रब्बी हंगाम करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी पाऊस कमी पडला त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे.
मंगी, उपरवाही, चंदनवाही, पाचगाव, पांढरपौणी, भूरकुंडा (बु.) इत्यादी गावे अमलनाला प्रकल्पात येतात. अमलनाला धरणाच्या पाण्यावर या परिसरातील शेतकरी शेती करतात. मात्र यावर्षी धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी झुडपेही वाढली असून कॅनलची दुरुस्ती केली नसल्याने शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.
कॅनलची दुरुस्ती करुन अमलनाला प्रकल्पाचे पाणी शेतीला सोडावे, अशी मागणी पाचगाव येथील शेतकरी तिरुपती इंदूरवार, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, नानाजी विरदंडे, गजानन भेंडे, किसन पिंपळकर, सुरेश वांढरे, लक्ष्मण नुलावार, बाबुराव विरदंडे, रुपेश गेडेकर यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
पाण्याअभावी शेतातील पीक सुकायला लागले आहे. परिसरात अमलनाला सारख्या मोठा सिंचन प्रकल्प असताना त्याचा फायदा शेतीला होताना दिसत नाही. अजूनपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी शेतीला सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.
- दशरथ भोयर, शेतकरी पाचगाव .