ताडोबा सफारी करून जाताना औषध निरीक्षकाचा अपघातात मृत्यू, पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 08:29 PM2023-05-19T20:29:29+5:302023-05-19T20:29:53+5:30
Chandrapur News कुटुंबीयासह ताडोबा सफारीसाठी गेल्यानंतर नागपूरकडे परतताना चिंधीमाल फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात चंद्रपूर येथील औषध निरीक्षक चंद्रमणी कान्होजी डांगे (५१, रा. रवीनगर, नागपूर) यांचा मृत्यू झाला.
चंद्रपूर : कुटुंबीयासह ताडोबा सफारीसाठी गेल्यानंतर नागपूरकडे परतताना चिंधीमाल फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात चंद्रपूर येथील औषध निरीक्षक चंद्रमणी कान्होजी डांगे (५१, रा. रवीनगर, नागपूर) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुमना डांगे या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रमणी डांगे हे आपल्या कुटुंबीय तसेच नातलगांसह १७ मे रोजी ताडोबा येथे सफारीसाठी गेले होते. दोन दिवस ताडोबात मुक्कामी होते. सफारी केल्यानंतर ते शुक्रवारी परतीच्या प्रवासासाठी नागभीडमार्गे नागपूरला निघाले होते. डस्टर कारमध्ये (एमएच ४० एसी ३०८३) पत्नी सुमन व मुलगी होती. ते स्वतः कार चालवीत होते, तर दुसऱ्या गाडीत त्यांचा साळा, साळ्याची पत्नी व मुले होती, अशी माहिती मिळाली आहे.
नागभीडमार्गे नागपूरला जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. धडक इतकी भीषण होती की, चंद्रमणी डांगे व त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. त्याचवेळी तळोधीकडून नागभीडकडे येत असलेले नागभीड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन चिलबुले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच रुग्णवाहिका बोलावली. चंद्रमणी डांगे आणि त्यांच्या पत्नीला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी डांगे यांना मृत घोषित केले. पत्नी सुमन यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. सुदैवाने त्यांच्या कारमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीला काहीही इजा झाली नाही. विशेष म्हणजे, चंद्रमणी डांगे हे चार दिवसांपूर्वीच कार्यालयीन कामासाठी नागभीडला आले होते, अशी माहिती मिळाली आहे.