दारूबंदीमुळे सामान्य झाले टेन्शन फ्री
By admin | Published: April 5, 2015 01:31 AM2015-04-05T01:31:10+5:302015-04-05T01:31:10+5:30
दारूबाजांमुळे ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास व्हायचा, त्यांना दारूबंदीमुळे दिलासा मिळाला आहे.
बल्लारपूर : दारूबाजांमुळे ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास व्हायचा, त्यांना दारूबंदीमुळे दिलासा मिळाला आहे. दारूबंदी अंमलात आल्यानंतर बहुतांश लोकांच्या अशाच प्रतिक्रिया आहेत.े
दारूचा सर्वाधिक त्रास महिलांना होता. नवरा आणि मुलांच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे संसार विस्कटले होते. त्यांना तो त्रास आता भोगावा लागणार नाही. याचे समाधान त्यांना आहे. दारूबाजांच्या धुमाकुळामुळे लोकांना त्रास व्हायचा. काही दारूबाज दारू पिऊन दारूच्या बाटल्या जाणिवपूर्वक रस्त्यावर फोडत असत. सोबत ओरडतही असत. १ एप्रिल पासून हा प्रकार बंद झाला आहे. येथील वर्धा नदीच्या गणेश विसर्जन घाटाजवळ हा प्रकार रात्रीच्यावेळी नित्याने चालायचा. त्याचा त्रास जवळपासच्या लोकांना होत असे. दारूबंदीनंतर तो त्रास बंद झाल्याने त्या परिसरातील नागरिक आनंदाने सांगत आहेत. दारूबंदी झाली तरी काही दिवस आपला दारूचा शौक चालू राहावा, याकरिता काहींनी दारूचा साठा घरात ठेवला असावा. त्यांना तो खुलेआम पिता येत नसल्याने त्याचा इतरांना मात्र त्रास होत नसल्याचे काहींनी सांगितले.बल्लारपूर परिसरात उद्योग मोठ्या संख्येने असल्याने कामगारांची संख्याही अधिक आहे. काम आटोपल्यानंतर अनेकजण श्रमपरिहारासाठी दारू दुकानांचे उंबरठे ओलांडायचे. त्यामुळे दारूचा खपही या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र महाराष्ट्र शासनाने दारूबंदीचा निर्णय घेतल्याने या तालुक्यातील चित्र बदलले आहे. (तालुका प्रतिनिधी)