आदीम कोलाम बांधवांचे राजुरात ढोल सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:03+5:302021-02-17T04:34:03+5:30

कोलामांचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचून कोलामांना न्याय मिळेल का, असा सवाल कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष ...

Drum Satyagraha of the primitive Kolam brothers in Rajura | आदीम कोलाम बांधवांचे राजुरात ढोल सत्याग्रह

आदीम कोलाम बांधवांचे राजुरात ढोल सत्याग्रह

Next

कोलामांचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचून कोलामांना न्याय मिळेल का, असा सवाल कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी उपस्थित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यासह कोरपना व राजुरा येथील आदिम कोलाम समुदायाचे ढोल सत्याग्रह आंदोलन कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे नेतृत्वात करण्यात आले. राजुरा येथील भवानी मातेचे पूजन करून हजारो कोलाम ढोल वाजवित उपविभागीय कार्यालयावर धडकले. ढोलाच्या तालावर थिरकणारी पावले अन् आपल्या परंपरेला साजेसे लाल-पांढरे झेंडे, पूजेचे सामान असलेले वडगे घेतलेला कोलामांचा जत्था पाहताना राजुरावासीय दंग झाले. आदिम कोलामांना संपूर्ण संरक्षण मिळावे, विनाअट वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, कोलामगुड्यावर तातडीने मूलभूत सोयीसुविधा बहाल करण्यात याव्यात, गेल्या दहा वर्षात बांधण्यात आलेल्या घरकुल व शौचालय बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासह खावटी अनुदान, उत्तम शिक्षण व आरोग्य अशा अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले.

उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी कोलामांचा लढा सरकारच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारे असून, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेला नाही. यातच शासन प्रशासनाचा पराभव आहे. सरकारने जागे होऊन कोलामांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पुजू कोडापे, सचीव मारोती सिडाम, नानाजी मडावी, वाघूजी गेडाम व अन्य सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Drum Satyagraha of the primitive Kolam brothers in Rajura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.