डी.टी.एड पदवीधारक लागले शेतीच्या कामाला
By admin | Published: August 25, 2014 11:55 PM2014-08-25T23:55:14+5:302014-08-25T23:55:14+5:30
शिक्षक बनण्याच्या ध्यास घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएड्चे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने बेरोजगार झालेले डीटीएड्धारक शेतीच्या कामाला लागले आहेत.
कोरपना : शिक्षक बनण्याच्या ध्यास घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएड्चे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने बेरोजगार झालेले डीटीएड्धारक शेतीच्या कामाला लागले आहेत. डीटीएड् धारकांना शिक्षकाची नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा डीटीएड्कडे कल कमी झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांअभावी अनेक अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. परिणामी सुरू असलेली अध्यापक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी शिक्षकाची हमखास नोकरी म्हणून डीटीएड्कडे पाहिले जात असे. १९७० ते १९८५ च्या काळात अध्यापनशास्त्राची पदविका घेतल्यानंतर हमखास शिक्षकाची नोकरी मिळत होती. पुढे १९९० पासून राज्य शासनाने शेकडो खासगी अध्यापक विद्यालयांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली. अध्यापक विद्यालयाची निवड करताना ३० टक्के उमेदवार व्यवस्थापन कोट्यातून निवडण्याचे अधिकार अध्यापक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले होते. यावेळी नोकरीच्या हव्यासापोटी कमी टक्केवारी असलेल्या व केंद्रीय फेरीत निवड न झालेल्या उमेदवारांना व्यवस्थापन कोट्यातून संधी मिळत होती. उमेदवार दोन ते अडीच लाखांपर्यंत पैसे भरूने डीटीएड् पदविका पूर्ण करीत होते. यानंतर राज्य शासनाने अध्यापक विद्यालयांना मान्यता देणे सुरुच ठेवल्याने कालांतराने डिटीएड् पदविका घेतलेल्या बेरोजगारांची फौज निर्माण झाली. राज्य शासनाने राज्यात शिक्षक भरतीसाठी २००९-१० मध्ये सीईटी परीक्षा घेतली होती. त्यानंतर मागील वर्षात सीईटी घेण्यात आली. या परीक्षेसाठी आवेदन दाखल करून परीक्षा दिली. परंतु या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागला. टक्केवारीच्या अर्हतेमध्ये जिल्ह्यातील मोजकेच डीटीएड्धारक टीईटी उत्तीर्ण झालेत.
संपूर्ण विदर्भाचा निकाल पाच टक्केच्या आतच होता. यामुळे डीटीएड्धारकांच्या अडचणी वाढल्या असून बेरोजगारांची फौज निर्माण होत आहे. परिणामी १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता डीटीएड्ला पाठ दाखवित आहेत. आजच्या घडीला राज्यात अनेक शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षक पदभरतीची प्रक्रीया बंद आहे. शाळा पडताळणीमध्ये राज्यभर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तिच स्थिती जिल्हा परिषदेची असून जिकडे तिकडे समायोजन प्रक्रिया होत आहे. त्यामुळे डिटीएड्धारकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न केवळ दिवास्वप्नच राहणार आहे. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड झालेला विद्यार्थी शेतीकामाच्या हंंगामावर रोजंदारीने मिळेल ते काम करीत आहे. अनेक डिटीएड्धारक बाहेर जिल्ह्यात कामाच्या शोधात जात आहेत. परिणामी अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने अनेक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. (शहर प्रतिनिधी)