पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:51 AM2019-06-22T00:51:01+5:302019-06-22T00:52:00+5:30
मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. सुमारे ५४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाचे आगमन झाले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी काही गावामध्ये पावसाने हजेरी दिली. मात्र, तेव्हापासून पत्ता नाही. १९७२ नंतर पहिल्यांदा असे चित्र पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. हवामान खात्याने यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज वर्तविला. तर दुसरीकडे ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्राने पाठ फिरविली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार आहे. पेरणीचा कालावधी निघून गेल्याने कापूस, सोयाबीनप्रमाणे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लवकर लागवड केल्यास कापसाचे अपेक्षित उत्पादन होते. कापूस लागवडीला उशीर झाल्यास उत्पादन घटते, असा अनुभव शेतकरी सांगतात. हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.
चिमूर, खडसंगी, शंकरपूर, भिशी, नेरी परिसरात शेतीच्या मशागतीची कामे झाली. नांगरणी, वखरणी, पºहाट्या वेचणीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. पण जमीन तापून असल्याने दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. मागील वर्षी धानाचे मोठे नुकसान झाले. शेकडो शेतकºयांना कर्जाचा भरणा करता आला नाही. यंदा हिच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे जगणे कठीण होईल, असे चित्र दिसून येत आहे.
शेतकरी हवालदिल
यावर्षी पाऊस मृग नक्षत्रात येणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, मृग नक्षत्र संपत आल्या नंतरही अद्याप पाण्याच्या थेंबाकरिता चिमूर, भिशी, शंकरपूर, जांमभूळघाट, आमडी, रेंगाबोडी, बोथली, वाहानगाव, नेरी, मोटेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. गार वारा सुटतो. हे पाहता पाऊस येणार, पेरणी होणार असे शेतकरी मनोमन पक्के करतो. मात्र, पावसाने अद्यापही हुलकावणीच देत आहे.