कारवाईच्या धास्तीने आरोपी न्यायालय परिसरातून पसार
By admin | Published: April 11, 2015 01:02 AM2015-04-11T01:02:38+5:302015-04-11T01:02:38+5:30
गांजा व चामडी प्रकरणात आपल्यावर कारवाई होणार या धास्तीने न्यायालयात तारखेवर आलेला आरोपी वनविभागाच्या
ब्रह्मपुरी येथील घटना : गांजा व चामडी प्रकरण
ब्रह्मपुरी : गांजा व चामडी प्रकरणात आपल्यावर कारवाई होणार या धास्तीने न्यायालयात तारखेवर आलेला आरोपी वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. सदर घटना ब्रह्मपुरी न्यायालय परिसरात शुक्रवारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
ब्रह्मपुरी येथील अश्विनी किराणा दुकानात एका स्पोटर्स बॅग मध्ये गांजा व चामडी ठेवून पसार झालेला आरोपी महेश तिमाजी देसाई व जयराम तटरीराम मडावी यांना ब्रह्मपुरी पोलिसांनी जेरेबंद केले होते. महेश देसाई याला चंद्रपूर न्यायालयातून जामीन मिळाला. तो आज ब्रह्मपुरी न्यायालयात तारखेवर हजर होण्यासाठी न्यायालय परिसरात आला असता, त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी वनविभाग पाळत ठेवून आहे, असा संशय येताच आरोपीने वनविभागाच्या हातावर तूरी देऊन पळ काढला. मात्र स्टेशन रोडवर एका घरी लपून बसलेल्या आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश आले.
फिर्यादी मोरेश्वर करंबे यांना फसविण्याच्या डावात आरोपींचा डाव फसला. गांजा प्रकरणात पोलिस विभागाची कार्यवाही झाली असता, चामडी प्रकरणात वनविभागाची कारवाई होणे बाकी होते. आरोपी हा दोनही विभागाचा आरोपी होता. परंतु, कारवाई पोलीस विभागाची झाली नंतर वनविभाग कारवाईसाठी वाट पाहत होता. पोलिसांच्या कार्यवाहीनंतर दोघांनाही चंद्रपूर येथे न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. नंतर आरोपी महेश देसाईची सुटका झाली तर दुसरा आरोपी जयराम मडावी कोठडीतच आहे. शुक्रवारी ब्रह्मपुरी न्यायालयात आरोपी महेश देसाई तारखेवर हजर होण्यासाठी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान आला. तेव्हा वनविभागही त्याच्यावर पाळत ठेवून होता. ही बाब आरोपीच्या लक्षात येताच त्याने न्यायालयातून पळ काढला व थेट धावत जाऊन शिवाजी चौक, बुरड मोहल्ला, पेठवार्ड असा प्रवास करीत एका घरी लपून बसला. तेथे पोलीस व वनविभाग आरोपीला शोधले असता, तो सापडला. वनविभागाने त्याला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (तालुका प्रतिनिधी)