बांधकामामुळे पुरातन विहिरीचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:26 AM2019-04-26T00:26:38+5:302019-04-26T00:27:43+5:30
येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी : येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शंकरपूर ते भिसी, जामगाव, गदगाव, चिमूर, मासळ, पिपर्डा, मार्गे पेठगावापर्यंत जाणारा हा मार्ग ताडोबा अभयारण्याला अगदी लागून आहे. शंकरपूर ते भिसी, गडपिपरी या गावाजवळ एक पुरातन विहीर असून ३५ ते ४० पायऱ्या आहेत. ही पायऱ्यांची विहीर नावाने ओळखल्या जाते. या विहिरीचे बांधकाम ३५० ते ४०० वर्षांपूर्वी झाल्याचे पुरातत्त्व अभ्यासकांचे म्हणणे आहे. भिसी येथील पुरातन भोसलेकालीन शिवमंदीरसुध्दा याच काळातील आहे. मंदिर व पायºयांच्या विहिरीचे बांधकाम एकसारखे आहे. बांधकामात वापरलेले दगड सारखेच असून वास्तू एकसारखी आहे. परिसरात अशा पध्दतीच्या पायºयांच्या विहिरी तीन ठिकाणी आहेत. आंबाई- निंबाई, लिंगोबा देवस्थान व गडपिपरी गावाजवळची एक अशा एकूण तीन विहिरी अजूनही अस्तित्व राखून आहेत. पुरातत्त्व विभागाचे या पुरातन वास्तुंकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. सन २००६ -०७ मध्ये गडपिपरी गावासाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत १८ लांखाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेतील विहीर पायऱ्यांच्या विहिरीपासून अगदी लागून बांधण्यात आली.
त्यावेळी भिसी येथील काही पुरातत्त्वप्रेमींनी त्या बांधकामाचा विरोध केला होता. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराने चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आणि पाठपुरावा करून बांधकाम पूर्ण करून घेतले. शंकरपूर ते पेठगाव या राज्य मार्गाची रूंदी १० मीटर असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बांधकाम करण्यात येणाऱ्या बाजुलाच ही विहीर आहे. युनिटी हायब्रीड नावाच्या या राज्य मार्गाला अधिक जागा लागत असल्याने ऐतिहासिक विहीर नष्ट करण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या विहिरीचे संवर्धन करून ऐतिहासिकेतचा अभ्यास केल्यास नवीन इतिहास पुढे येऊ शकतो.
पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी विशेष निधीची तरतूद असते. पायऱ्यांच्या विहिरींचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार सुरू केला आहे.
- युवराज मुरस्कर, अध्यक्ष ट्री फाऊंडेशन, चिमूर
पायºयांच्या विहिरीपासून रस्त्याची रुंदी कमी केल्या जाईल. पुरातन वास्तूला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल.
- समीर उपगंडलावर, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिमूर